News Flash

डोंबिवलीचा ‘बाहुबली’

अश्विन गायकवाड या तरुणाने ‘बाहुबली’ चित्रपटासाठी स्टंटमन म्हणून काम केले आहे.

बिवलीतील शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अश्विन गायकवाड या तरुणाने ‘बाहुबली’ चित्रपटासाठी स्टंटमन म्हणून काम केले आहे.

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा प्रेक्षकांसाठी कदाचित एक साधासा प्रश्न असेल. ज्याचं उत्तर दीड वर्षांने का होईना येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सिक्वलमधून सगळ्यांना मिळणार आहे. पण या एका प्रश्नाचे उत्तर हजारो कोटी रुपयांचे असल्याने ते कुठल्याही माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांच्या एकूणच टीमने इतकी काटेकोर काळजी घेतली आहे की अमरेंद्र बाहुबलीच्या युद्धकौशल्यामागचे खरे चेहरे ठिकठिकाणी पसरलेले असूनही कोणाकडूनच ‘बाहुबली’विषयी चकार शब्द बाहेर पडलेला नाही. डोंबिवलीतील शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अश्विन गायकवाड या तरुणाने ‘बाहुबली’ चित्रपटासाठी स्टंटमन म्हणून काम केले आहे. रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य दिसणारे बाहुबलीचे स्टंट्स प्रत्यक्ष करतानाच्या गमतीजमती अश्विनकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

महिष्मतीचा राजा अमरेंद्र बाहुबली ज्याला कोणीही मारू शकत नाही, त्याचं युद्धकौशल्य किती अफाट असायला हवं. केवळ बाहुबलीच नाही, तर त्याचा भाऊ भल्लालदेव, त्याचा निष्ठावंत सेवक कटप्पा आणि महिष्मतीची फौज सगळेच युद्धनीतीत पारंगत.. मात्र पडद्यावर ही कथा रंगवताना केवळ व्हीएफएक्सचीच मदत दिग्दर्शकाला घ्यावी लागली असे नाही, तर अनेक स्टंट्समनच्या आधारे या चित्रपटातील युद्धकौशल्याचे प्रसंग जिवंत झाले आहेत. व्हीएफएक्स तंत्रज्ञान हे या चित्रपटाचा प्राण आहे. सगळे चित्रीकरणच मुळी क्रोमावर करण्यात आले आहे. दोन भागांतील या चित्रपटाचे स्टंट्स पूर्ण करण्यासाठी आम्ही स्टंट्समन जवळपास महिनाभर रामोजी फिल्मसिटीतील या चित्रपटाच्या सेटवर होतो, असे अश्विनने सांगितले. अश्विन डोंबिवलीतील एका शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करतो. पण अनेक चित्रपटांमध्ये स्टंटमन म्हणूनही त्याने काम केले आहे. तो स्वत: कराटे, मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अश्विनने स्टंटमन म्हणून काम केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून िहदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्शन चित्रपट बनत नाहीत, त्यामुळे मनासारखे काम करता येत नाही याची खंत असलेल्या अश्विनची निवड ‘बाहुबली’च्या स्टंटदृश्यांसाठी झाली तेव्हा खरं म्हणजे या चित्रपटाचा अवाका कोणाच्या फारसा लक्षात आला नव्हता. दक्षिणेत अ‍ॅक्शन चित्रपटांची निर्मिती सातत्याने होते. त्यामुळे तिथल्या चित्रपटांसाठी स्टंटमन म्हणून काम करण्याची अनेकदा संधी मिळते. याआधीही अश्विनने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी स्टंटमन म्हणून काम केले होते. त्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर तो हैदराबादमध्ये ‘बाहुबली’च्या चित्रीकरणासाठी पोहोचला तेव्हा त्याच्याबरोबर फक्त या चित्रपटातील स्टंटदृश्ये पूर्ण करण्याकरिता ५० ते ५५ स्टंटमन्सचा ताफा सेटवर हजर होता. मी एकटाच महाराष्ट्रातून तिथे गेलो होतो, बाकीचे अनेक स्टंटमन हे हैदराबादचे आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नेहमी काम करणारे होते, अशी माहिती अश्विनने दिली.

‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हाच खरं म्हणजे दुसऱ्या भागाचीही तयारी झाली होती. त्यामुळे ‘बाहुबली’च्या या सिक्वलपटातील स्टंटदृश्यांचे चित्रीकरणही पहिल्याच वेळी करण्यात आले होते, असं गुपित अश्विनने सांगितलं. कित्येकदा महत्त्वाची स्टंटदृश्ये सोडली तर बाकीची दृश्येही आधीच चित्रित करून मग संगणकावर हवी तशी बदलता येतात. त्यामुळे दुसऱ्या भागासाठी पुन्हा स्वतंत्रपणे चित्रीकरण केलेले नाही. दुसऱ्या भागाचे बरेचसे चित्रीकरण आधीच करण्यात आले होते. केवळ व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या कामासाठी जास्त वेळ घेण्यात आला असल्याचं त्याने सांगितलं.

या चित्रपटाची बित्तंबातमी बाहेर पडू नये यासाठी स्टंटमनची फौजही वेगळी ठेवण्यात आली होती. एवढय़ा मोठय़ा सेटवर महिनाभर राहूनही त्यांना या चित्रपटातील कलाकारांची भेट घेऊ दिली नाही. त्यांचा विभाग स्वतंत्रपणे अ‍ॅक्शन दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होता. स्टंट्सचे अनेक साधे साधे प्रकार हिरोंना करता येत नाहीत. पायाला ठेच लागल्यावर जमिनीवर कसे कोसळावे, हेदेखील अनेकदा अभिनेत्याला करता येत नाही. अशा वेळी पडण्याचा प्रसंगदेखील स्टंटमनवर चित्रित केला जातो. ‘बाहुबली’च्या सेटवर असे अनेक स्टंट्स करता आलेच, मात्र त्याचबरोबर नव्याने काही गोष्टी शिकायची संधी मिळाली, असे अश्विन सांगतो. या चित्रपटातील १६ ते १७ मिनिटांच्या प्रसंगात अश्विनने काम केले आहे. माझ्यासोबत हैदराबादमधील अनेक तरुण मंडळी होती, असे त्याने सांगितले.

‘बाहुबली’ची शान असणारा तो धबधबाच मुळात खरा नाही. तो तंत्रज्ञानाच्या मदतीने उभा करण्यात आला आहे,

मात्र त्यात नायकाचे पाण्यात उडी मारण्याचे, धबधबा पार करून जाण्याचे जे प्रसंग आहेत ते स्टंटमनने केलेले आहेत. पाण्यात उडी मारण्याची महत्त्वाची दृश्ये अश्विनवर चित्रित झाली आहेत. याशिवाय, लढाईच्या वेळचे अनेक समूहातील प्रसंग, मारामारीचे प्रसंग हेही स्टंटमनवर चित्रित केले गेले आहेत. अगदी मारामारीनंतर जमिनीवर कोसळण्याचे जे प्रसंग आहेत तेही स्टंटमनवर चित्रित झाले असून नंतर त्यांना त्या त्या कलाकाराचा चेहरा देण्यात आला असल्याचे अश्विनने सांगितले. स्टंटमनचे काम हे पडद्यामागचेच असते. त्यामुळे इथेही त्यांच्या स्टंट्सना नायक प्रभास, राणा डुग्गुबाती यांचे चेहरे मिळाले आहेत. पण इतक्या मोठय़ा चित्रपटात काम करण्याचा आपला अनुभव खूपच रोमांचकारी होता, असे त्याने सांगितले. कलाकारांची भेट झाली नाही तरी ‘बाहुबली’च्या सेटवरचे वातावरण मात्र खूप मजामस्तीचे होते, अनेक गोष्टी नव्याने शिकवणारे होते, असे तो म्हणतो.

मुळात, वर्षांला दोन ते तीन अ‍ॅक्शनपटांची निर्मिती होते. त्यामुळे स्टंटमनना फारसे काम मिळत नाही. हिंदीत अ‍ॅक्शनपटांचे प्रमाण कमी असल्याने अनेक स्टंटमनचा ओढा हा दाक्षिणात्य चित्रपटांकडेच असतो. या पाश्र्वभूमीवर ‘बाहुबली’सारख्या इतिहास रचणाऱ्या चित्रपटाचा भाग होता आले म्हणून आपल्याला कायम हा चित्रपट स्मरणात राहील, असे तो सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 2:48 am

Web Title: ashwin gaikwad of dombivli worked as a stuntman in bahubali
Next Stories
1 ‘मला काहीतरी वेगळं सांगायला आवडतं’
2 आजोबांच्या धमाल गोष्टी
3 नवी दृष्टी देणारं ‘अपूर्व मेघदूत’
Just Now!
X