आजच्या काळात मदत ही संकल्पना म्हणजे माझा काय फायदा? तो होणार असेल तर देईन अशी प्रवृत्ती पाहायला मिळत असताना केवळ एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या उपक्रमावर आणि ग्रुपमधील व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवून अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आर्थिक मदत केली. अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांचे आभार मानले. अश्विनी भावे यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला पाच लाख रुपये मदत म्हणून दिली आहे आणि त्यांनी यापुढील तीन महिने अशाच पद्धतीने मदत करण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच एकूण २० लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे.
‘आपली मदत योग्य त्या गरजू लोकांपर्यंत निश्चितच मिळेल या खात्रीने इतकी मोठी रक्कम देऊन उपक्रमाला पाठबळ देणं ही खरंच कौतुकाच्या पलीकडची गोष्ट आहे. अशावेळी आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि आपण सर्वांनी मिळून ती जबाबदारी नक्की निभावू हा विश्वास आहे’, असं प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्टवर लिहिलं.
अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांचं जसं नुकसान होतं, तसं नुकसान यावेळी नाट्यनिर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाट्यसृष्टीचं झालं आहे. करोना विषाणूमुळे झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. नाटकाच्या बाबतीत काही तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेजच्या कलाकारांचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवर चालते. आता प्रयोगच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी बऱ्याच कलाकारांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 2:49 pm