बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक तयार करण्याचा ट्रेड सुरु आहे. येत्या काळात जवळपास १० बायोपिकपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या यादीत आता आणखी एक नाव जोडले जात आहे. हा आगामी चरित्रपट इन्फोसेसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती व त्यांची पत्नी सुधा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘मूर्ती’ नामक या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांनी स्विकारली आहे.

कोण आहेत एन. आर. नारायण मूर्ती?

इन्फोसेस ही भारतीय आयटी उद्योगक्षेत्रातील अव्वल कंपनी म्हणून ओळखली जाते. नारायण मूर्ती हे वर्षाला तब्बल १०० अब्ज अमेरिकी डॉलरची उलाढाल करणाऱ्या इन्फोसेसचे सह-संस्थापक आहेत. देशातील लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या कंपनीची सुरुवात मूर्तींनी कशी केली? या कामात त्यांना कोणते अडथळे आले? आणि या अडथळ्यांवर मात करत त्यांनी कशाप्रकारे आपले स्वप्न पूर्ण केले याबाबत या चित्रपटात दाखवले जाणार आहे. या चित्रपटात नारायण मूर्ती यांची यशोगाथा दाखवली जाणार आहे.