अभिनेता आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे असिन. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण काही हिट चित्रपटात काम करुनही असिन आज बॉलिवूडपासून लांब आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी असिनचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…

२००८ साली आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असिन यांची मुख्य भूमिका असलेला ‘गजनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे आमिर खान आणि असिन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. या चित्रपटात असिनने कल्पना शेट्टी ही भूमिका साकारली होती. या पहिल्या वहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केल्याचे म्हटले जाते.

त्यानंतर तिने ‘लंदन ड्रीम्स’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर असिनने २०११मध्ये सलमानसोबत रेडी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. पण तिने वर्षाला एक चित्रपट करण्याचे ठरवले होते.

२०१२ नंतर असिनने हाउसफुल 2, बोल बच्चन आणि खिलाड़ी 786 या चित्रपटांमध्ये काम केले. पण चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

असिनने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतर असिनने कलाविश्वातून काढता पाय घेतला आहे. तिने लग्नानंतर कलाविश्वातील वावर कमी केला. मात्र तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेकदा ती नवऱ्यासोबत आणि मुलगी एरिनसोबतचे फोटो शेअर करत असते.