मारहाण केल्याप्रकरणी पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे अटक होण्याच्या भितीने सत्र न्यायालयात धाव घेणारे अभिनेते ओम पुरी यांना ३० ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
ओम यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पत्नी नंदिता हिने पोलिसांत केल्यानंतर पुरी यांनी अटक होण्याच्या भीतीने मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांच्यासमोर बुधवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्या वेळी पोलिसांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने अर्जावरील सुनावणी ३० ऑगस्टपर्यंत तहकूब करीत, तोपर्यंत पुरी यांना अटक न करण्याचे आदेश दिले. मात्र तोपर्यंत पुरी यांनी रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. दरम्यान, पुरी यांच्या पत्नीने न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला आहे.
अटकपूर्व अर्जात पुरी यांनी नंदिता यांनी लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. अर्जात पुरी यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मोलकरणीच्या मुलीने आपल्या मुलाला राखी बांधली. त्यानंतर आपल्या पत्नीने तिला तीन हजार रुपयांचा मोबाइल भेट म्हणून दिला, परंतु त्या मुलीने स्मार्टफोनची मागणी केली. महागडा फोन देण्याबाबत आपण आक्षेप घेतल्यानंतर नंदिताने, मैत्रिणींवर उधळण्यासाठी पैसे खर्च करता येतात, पण या मुलीला महागडय़ा फोनसाठी पैसे देऊ शकत नाही, असा आरोप आपल्यावर करीत वाद घातला. आपण वाद टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नंदिताने आपली कॉलर पकडली. अखेर तिला ढकलून आपण घरातून निघून गेलो. आपण नंदिताला कधीच मारहाण केलेली नाही, असा दावाही पुरी यांनी अर्जात केला आहे.