भारत सरकारतर्फे सध्या गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’चे आयोजन करणाऱ्या एण्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवातर्फे पुढील वर्षीपासून नियमितपणे आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती एण्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांनी रविवारी ‘इफ्फी’ महोत्सवात दिली. ‘इफ्फी’ महोत्सवातील ओपन फोरम चर्चेत त्यांनी ही घोषणा केली.  गेल्या १० वर्षांपासून एण्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवातर्फे ‘इफ्फी’ महोत्सवाचे यशस्वीरीत्या आयोजन केले जात असून, आता २०१४ सालापासून एशियन फिल्म फाऊंडेशनच्या मदतीने आशियाई चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले आहे, असे वाघ यांनी जाहीर केले. फेब्रुवारी २०१४ मध्ये आशियाई चित्रपट महोत्सव भरविण्यात येईल. एशियन फिल्म फाऊंडेशनच्या वतीने मुंबई, कोल्हापूर आणि पुणे येथे दरवर्षी ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सव भरविण्यात येतो.