मराठी चित्रपटसृष्टी सध्या सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. मराठी चित्रपट नेहमीच्या चाकोरीतून बाहेर पडून जेव्हा नवे विषय, नवा आशय, नवी शैली आणि नवी मांडणी असे आव्हान स्वीकारून काम करू लागले तेव्हा मात्र आपणही गुणवत्तेत कोठे कमी नाही हे दाखवून दिले आहे. राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या तसेच आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवून परीक्षकांची वाहवा मिळविलेला चित्रपट म्हणजे “अस्तु”.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गौरीका फिल्मसच्या शीला राव आणि डॉ. मोहन आगाशे यांनी केली आहे. स्मृतिभ्रंशाचा आजार असलेल्या एका निवृत्त अधिकार्‍याची कथा या चित्रपटात उत्तम पद्धतीने हाताळली असून या चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, अमृता सुभाष, मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, इरावती हर्ष, नचिकेत पूर्णपात्रे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
“अस्तु” हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने केवळ पुणे शहरात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी “कॅटापुल्ट”च्या माध्यमातून क्राऊड फंडिंगचा एक अनोखा पर्याय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडला असून “कॅटापुल्ट”च्या सतीश कटारिया यांनीही यासाठी पुढाकार घेतला असल्याचे निर्मात्या शीला राव यांनी सांगितले.
सर्वसामान्यांकडून चित्रपट निर्मितीसाठी किंवा प्रदर्शनासाठी निधी जमा करण्याची संकल्पना म्हणजेच “क्राऊड फंडिंग”. सध्या भारतातही मोठ्या प्रमाणात हा अनोखा फंडा यशस्वी होत आहे. हा फंडा ‘क्रो फंडिंग’च्या नावानेही ओळखला जातो. आपल्या चित्रपटासाठी पैसे नसलेल्या वा ते जमवण्यात अडचण येणा-या चित्रपट निर्मात्यांना या संकल्पनेने आतापर्यंत मोठा सहारा दिला आहे. आजवर अनेक तमिळ, मल्याळम, कन्नड  तसेच नुकत्याच काही वर्षांपूवी प्रदर्शित झालेल्या रजत कपूर निर्मित “भेजा फ्राय” ह्या हिंदी सिनेमांसाठी ही “कॅटापुल्ट”च्या माध्यमातून क्राऊड फंडिंग मिळवून हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. कन्नड भाषेतील Lucia हा सिनेमा देखील क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्यावेळी तो चित्रपट सुपरहिट ठरला होता. “अस्तु” चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच क्राऊड फंडिंगची मदत घेऊन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
http://www.catapooolt.com/ या वेबसाईट वर लॉगिन करून आपण अवघ्या ५०० रुपयांपासून ते अगदी १ लाख रुपयांपर्यंत आपण या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आपली बहुमुल्य मदत करू शकता.