06 July 2020

News Flash

‘प्रभात’चे सहस्त्रचंद्रदर्शन!

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळाचा अनुभव देणाऱ्या ‘प्रभात’ युगाचा साक्षीदार आणि मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह रविवारी (२१ सप्टेंबर) आपल्या स्थापनेची ८० वर्षे पूर्ण करीत

| September 21, 2014 12:37 pm

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळाचा अनुभव देणाऱ्या ‘प्रभात’ युगाचा साक्षीदार आणि मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह रविवारी (२१ सप्टेंबर) आपल्या स्थापनेची ८० वर्षे पूर्ण करीत आहे. हे औचित्य साधून प्रभात चित्रपटगृहविषयक आठवणींचा खजिना असलेल्या पुस्तकाचे ४ ऑक्टोबर रोजी प्रकाशन होणार आहे. या वास्तुला हेरिटेज दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
प्रभात चित्रपटगृहाच्या जागेवर पूर्वी इंदूर येथील सरदार किबे यांचा वाडा होता. ज्ञानप्रकाश दैनिकाचे कार्यालय आणि छापखाना होता. १९३४ मध्ये सरदार रामचंद्र किबे यांनी हे चित्रपटगृह उभारले आणि या वास्तुला ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असे मातोश्रींचे नाव दिले. कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झालेली प्रभात फिल्म कंपनी आणि त्यांचे वितरक फेमस पिक्चर्स यांनी हे चित्रपटगृह चालवायला घेतले आणि आजही ते प्रभात चित्रपटगृह म्हणून चित्रपट रसिकांच्या सेवेत कार्यरत आहे, अशी माहिती विवेक दामले यांनी दिली.
प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार तळमजल्याला दोन वर्ग आणि महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था होती. मुलांच्या रडण्याचा प्रेक्षकांना त्रास होऊ नये यासाठी महिलांच्या वर्गात दोन काचेच्या खोल्या (क्राय बॉक्स) करण्यात आल्या होत्या. ही सोय त्या काळी कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय झाली होती. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वेळोवेळी बदल करण्यात आले असून सध्या डॉल्बी सिस्टिम बसविण्यात आली आहे. लवकरच प्रभात चित्रपटगृह वातानुकूलित करण्याचा मानस आहे.
‘लव्ह मी टुनाईट’ या बोलपटाने २१ सप्टेंबर १९३४ रोजी चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. १७ ऑक्टोबर १९३४ रोजी विजया दशमीच्या मुहुर्तावर ‘अमृतमंथन’ हा पुण्यातील पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आजतायागयत मराठी, हिंदूी आणि इंग्रजी भाषेतील १३०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ३७ मराठी आणि ९ हिंदूी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला असून ‘माहेरची साडी’ चित्रपटाने दोन वर्षांहून अधिककाळ ठाण मांडून नवा विक्रम प्रस्थापित केला. ‘वीर सावरकर’ चित्रपट पाहण्यासाठी तत्कालीन सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंहजी ऊर्फ रज्जूभैय्या आणि ‘जाऊ तिथं खाऊ’ पाहण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रभात चित्रपटगृहामध्ये आले होते. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, जया बच्चन, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे यांनी चित्रपटगृहाला भेट दिली असून सचिन, महेश कोठारे यांच्यासह कलावंत, तंत्रज्ञ चित्रपटांच्या प्रदर्शनानिमित्त येतात, असेही विवेक दामले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2014 12:37 pm

Web Title: at 80 prabhat theatre stands tall with its cultural legacy
टॅग Entertainment
Next Stories
1 ‘तरुण तुर्क..’चा पाच हजारावा प्रयोग!
2 लोकसत्ता एलओएल: या चायनीज नावांबद्दल भविष्यात दूरदर्शनचा गैरसमज होऊ शकतो.
3 सलमान बिग की शाहरूख बॉस?
Just Now!
X