प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. नरेंद्र भिडे यांच्या निधनाच्या वृत्तावर संगीतकार अतुल गोगावलेला विश्वासच बसत नाहीये. फेसबुकवर अतुलने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.
‘बबड्या.. फोन उचल.. हे लोकं काहीपण बोलत आहेत. प्लीज मला फोन’, अशा शब्दांत अतुलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गायक राहुल देशपांडेनंही धक्क्यातून सावरलो नसल्याचं व्यक्त केलं. ‘आपण परवा भेटलो आणि छान बोललो, तू असा अचानक सोडून जाशील असं स्वप्नातसुद्धा वाटलं नाही. अजून धक्क्यातून बाहेर आलो नाहीये. मित्रा, तू खूप दिलासा दिलास, तुझ्या आत्म्यास सद्गती मिळो ही प्रार्थना’, अशी पोस्ट त्याने लिहिली.
नरेंद्र भिडे यांनी ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली होती. सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 5:33 pm