19 November 2019

News Flash

‘मी प्रेमात कसा पडलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे’

दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमचा आम्हाला अवकाश आहे किंबहुना तो असावाच, असं मला वाटतं- अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी व त्याची पत्नी गीतांजली

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. या हरहुन्नरी कलाकाराचा आज वाढदिवस. कर्नाटकमधील बेळगावात जन्माला आलेल्या या गुणी कलाकाराने नानाविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. शाळेतील दिवसांमध्ये अतुलने नाटकांमधून काम करत अभिनयाची आवड जोपासली. नंतर कॉलेजच्या दिवसात त्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. शिकत असतानाच तो सोलापूरमधील ‘नाट्य आराधना’ या हौशी कलाकारांच्या ग्रुपमध्ये सामील झाला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ नवी दिल्ली येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अतुलला ‘हे राम’ (२०००) आणि ‘चांदनी बार’ (२००२) चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

अतुल कुलकर्णीने अभिनेत्री गीतांजली हिच्यासह प्रेमविवाह केला. १९९३ साली एनएसडीमध्ये अतुलची भेट गीतांजलीसोबत झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एकदा अतुल कुलकर्णीने हजेरी लावली होती. तेव्हा अतुल म्हणालेला की, मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो. हा केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता. सोलापुरात मी एक नाटक केले होते. त्या नाटकाने मला रंगभूमीच्या प्रेमात पाडले. त्यानंतर मी एनएसडी मध्ये प्रवेश मिळवला. तर एनएसडीत गीतांजलीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. मी प्रेमात कसा पडलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे, असे त्याने म्हटले होते.

लोकसत्तामधील एका लेखात अतुलने म्हटले होते की, एनएसडीला गीतांजली भेटणं, आमचे विचार जुळणं. त्यातले अर्थातच कुठल्याच दोन व्यक्तींमध्ये शंभर टक्के विचार कधीच जुळत नसतात. परंतु आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो, हे महत्त्वाचं वाटतं. दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमचा आम्हाला अवकाश आहे किंबहुना तो असावाच, असं मला वाटतं. पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्वं आहेत, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे.

First Published on September 10, 2019 11:23 am

Web Title: atul kulkarni birthday special his love story and career ssv 92
Just Now!
X