’यशवंत देवस्थळी प्रथमच चित्रपट निर्मितीत * ’अतुल कुलकर्णीची ‘कॅफे कॅमेरा’ कंपनी
‘राजवाडेंचा कुत्रा आहे तो पैसेही चाटतो..’ सारखे सहजपणे ‘डायलॉग’ मारणारी तरुण पिढी, कित्येक दिवसांनी एकत्र आल्यानंतर स्मरणरंजनात
अडक लेली मोठी पिढी आणि आपल्याच मुला-नातवंडांबरोबर बदलते विश्व पाहत पुढे सरकत असताना कुठेतरी आपल्या घराला एकत्र बांधून ठेवू इच्छिणारी जाणती पिढी.. अशा तीन पिढय़ांची एकत्र मोट बांधत बदलत चाललेल्या एकत्र कुटुंबाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी आपल्या आगामी ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटातून केला आहे. नवे विचार मांडू पाहणाऱ्या या चित्रपटाला त्याच नव्या विचारांचे प्रणेते असलेले दोन नवीन निर्माते लाभले आहेत.
‘हॅप्पी जर्नी’नंतर पुन्हा सचिन कुंडलकरबरोबर एकत्र काम करताना अभिनेता अतुल कुलकर्णी ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्िंडग्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यशवंत देवस्थळी हेही पहिल्यांदाच चित्रपटनिर्मितीत उतरले आहेत. एरव्ही पूर्णत: उद्योग आणि आर्थिक घडामोडींमध्ये अडकलेल्या देवस्थळींना चित्रपट क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांबद्दलही तितकीच उत्सुकता होती. उद्योग क्षेत्रात तुमचे व्यवहार पारदर्शी असणं आणि तुमच्या कामातली व्यावसायिकता, शिस्त फार महत्त्वाची ठरते. कोटय़वधींची उलाढाल करणाऱ्या चित्रपट क्षेत्रात मात्र व्यावसायिक शिस्तीचा अभावच असतो असे मी कायम ऐक त आलो आहे. त्यामुळे खरोखरच या क्षेत्रात उतरून चित्रपट निर्मितीचा व्यवसाय आणि त्याची आर्थिक गणिते समजून घेण्याची खूप इच्छा होती, असे यशवंत देवस्थळी यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. अतुल कुलकर्णी यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे अतुल आणि सचिन जेव्हा ‘राजवाडे अँड सन्स’च्या निमित्ताने निर्मितीसाठी एकत्र आले तेव्हा निर्माता म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकण्याची ही संधी देवस्थळींनी हातची जाऊ दिली नाही. ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटाच्या विषयाचा अवाका मोठा आहे. तेरा व्यक्तिरेखा, या तेरा कलाकारांच्या तारखा, त्यांच्या अडचणी सगळ्याची जुळवणूक करत बंदिस्त स्टुडिओपेक्षा वेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करणं हे आव्हान या अतुल आणि सचिन या दोघांनी छान पेललं आहे. आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारची बेशिस्त नव्हती की आर्थिक व्यवहारात काही घोळ नव्हता. निर्माता म्हणून पहिल्याच चित्रपटात आपल्याला उत्तम व्यावसायिकतेचा अनुभव वाटय़ाला आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. केवळ चित्रपट निर्मिती उत्तम असून चालत नाही. त्याची कथाही तितकीच सक्षम असणं गरजेचं असतं. ‘राजवाडे अँड सन्स’ चित्रपटाची कथा त्यातील तीन गोष्टींमुळे आपल्याला फार महत्त्वाची वाटल्याचे देवस्थळी यांनी सांगितले. एक म्हणजे कुटुंबातील कर्त्यांचे दुराग्रही विचार. आजही आपल्याकडे घरातील कर्ते आमचेच विचार, कृती खरी आहेत, असं मानतात. माझंच म्हणणं खरं ही वृत्ती अजूनही घराघरांमधून वरचढ ठरते. त्यामुळे दुसऱ्यांचे विचार समजून घेऊन ते मांडण्याची वृत्ती, तेवढा संयमच समाजात उरलेला दिसत नाही. घरापासून सुरू झालेली ही दुराग्रही वृत्ती समाजातही तेवढय़ाच वेगाने पसरते. त्यामुळे या वृत्तीवर बोट ठेवणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे कुटुंबातही वागताना आपण दुटप्पीपणे वागत असतो. आपल्याला एक न्याय आणि आपल्याच घरातील सदस्यांसाठी दुसरा न्याय यामुळे कुटुंबातही आपण विश्वास गमावून बसतो. तिसरी आणखी एक गोष्ट दिग्दर्शकाने पहिल्यांदाच कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे आपण कितीही अमान्य केलं तरी बऱ्याच वेळा एकाच व्यक्तीची दोन व्यक्तिमत्त्वं असतात. हे तीनही मुद्दे आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे. तरुणांना त्यांच्या काळाशी सुसंगत असे विचार चित्रपटांमधून दिले तर ते त्यांच्याशी अधिक जोडले जातील. ‘राजवाडे अँड सन्स’ हा त्या धाटणीचा चित्रपट आहे आणि म्हणूनच निर्माता या भूमिकेतून आपण त्याच्याशी जोडले गेलो आहोत, याचा आनंद वाटत असल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.
‘कॅफे कॅमेरा’ या वेगळ्याच नावाने अतुल कुलकर्णी या चित्रपटाशी निर्माता म्हणून जोडला गेला आहे. पूर्वीच्या काळी जे काम गप्पांचे अड्डे, कट्टे करायचे तेच काम आज कॉफीच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी देणारे ‘कॅफे’ करतात. युरोपात अनेक चळवळी या कॅफेमधून सुरू झालेल्या आहेत. इथे कॅमेऱ्याशी संबंधित कामासाठी ‘कॅफे’मध्ये एकत्र आलेली मंडळी या सहज विचाराने कंपनीचे नाव ‘कॅफे कॅमेरा’ ठेवले असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. एक अभिनेता म्हणून पंधरा वर्षे काम के ल्यानंतर एक साचेबद्धपणा येतो. अशा वेळी माझ्या आवडत्या क्षेत्रातील वेगळे आव्हान स्वीकारावं असं वाटलं. आत्तापर्यंत मी सात वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चित्रपट निर्मितीची प्रक्रियाही मी अनुभवलेली आहे. या सगळ्यातले उत्कृष्टत्व सांधत आपणही एक चांगली चित्रपट निर्मिती करावी, असा विचार आल्याचे सांगतानाच अतुल कुलकर्णी यांनी व्ही. शांतारामांच्या विधानाची आठवण करून दिली. व्ही. शांताराम नेहमी म्हणायचे, चित्रपट हा ऐंशी टक्के व्यवहार आणि वीस टक्के कला असते. चित्रपट ही त्या अर्थाने खरोखरच महागडी कला आहे. याबाबतीत माझे आणि सचिनचे विचार जुळले आणि म्हणूनच या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
देवस्थळींसारखी स्वत: आधुनिक विचारांची पुरस्कर्ता असलेली व्यक्ती या चित्रपटाशी जोडली गेली. त्यांना चित्रपटाची कथा पटली आणि ती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावी हा त्यांचाही आग्रह होता. त्याच पद्धतीने, नव्या विचारांनी, नव्या माध्यमांच्या मदतीने एकत्र असणाऱ्या कुटुंबाची ही कथा चित्रपटात पाहायला मिळेल, असे कुलकर्णी म्हणतात. एखादा मुलगा कुटुंबापासून दूर गेला म्हणजे कुटुंब दुभंगले असे म्हटले जाते. आज कुटुंबाच्या एकमेकांना जोडलेले राहण्याच्या व्याख्या बदललेल्या आहेत. त्याची मांडणी ‘राजवाडे अँड सन्स’मधून पाहायला मिळेल, असं अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं.