सत्य घटनेवर आधारित असलेला ‘आसरा’ हा हिंदी चित्रपट २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संवेदनशील कथानक आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

‘पद्माविजन’ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सदानंद शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा त्यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित आहे. मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या जगण्यावर हा चित्रपट भाष्य करतो. अभिनेता अतुल कुलकर्णी, रघुवीर यादव, अशोक समर्थ, सुनील पाल, ओंकारदास माणिकपुरी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाची कथा एम. के. शंकर यांनी लिहिली आहे. पटकथा आणि दिग्दर्शन राज सागर यांचं आहे. तर संवादलेखन विशुद्ध आनंद शर्मा यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन अबधेश गोस्वामी यांनी केलं असून, रघुवीर यादव, सिद्धार्थ महादेवन, अभिजीत कोसम्बी व अबधेश गोस्वामी यांनी गाणी गायली आहे. कृष्णा सोरेन यांनी छायालेखन, बी. महंतेश्वर यांनी संकलन केलं आहे. चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन एन डी ९ स्टूडियोमध्ये करण्यात आलं.

चित्रपटाबाबत निर्माता सदानंद शेट्टी म्हणाले, ‘माझ्या आयुष्यातील २१ वर्षांवर हा चित्रपट बेतला आहे. स्वत: अनुभवलेल्या घटना या चित्रपटात आहेत. आजही झोपडपट्टीधारक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्याचं चित्रण या चित्रपटात आहे.’

‘उत्तम स्टारकास्ट आणि संवेदनशील कथानक ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं चित्रीकरण रिअल लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना वास्तवाची दाहक धग अनुभवता येईल,’ असं दिग्दर्शक राज सागर यांनी सांगितलं.