ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव या दांपत्याने एकमेकांबरोबर नृत्य करण्यासाठी ताल धरला आणि प्रेक्षकांनीही त्यांना टाळ्यांचा कडकडाटात आणि कॅमेऱ्यांचा ‘क्लिकक्लिकाट’ करत उत्स्फूर्त दाद दिली!.. निमित्त होते ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या पिंपरी-चिंचवडमधील उद्घाटनाचे.

पिंपरी-चिंचवडमधील ‘अ‍ॅडलॅब्ज’ चित्रपटगृहात हे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पुण्यात देव यांच्याच हस्ते कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृह परिसरातील ‘पिफ बझार’चेही उद्घाटन करण्यात आले. सीमा देव यांना गुरुवारी ‘पिफ’तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने ‘पिफ बझार’मध्ये त्यांच्याबरोबर वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, या गाजलेल्या चित्रपटांचे अनुभव सीमा देव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘ज्येष्ठ दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे अभिनयातील इतक्या बारीकसारीक गोष्टी समजावून सांगायचे की, त्यांच्यासमोर ‘मला जमत नाही’ असे म्हणणे फार अवघड व्हायचे. त्यांनी घेतलेल्या या तालमींमुळेच माझा अभिनय परिपूर्ण होऊ शकला आणि मराठीप्रमाणेच हिंदीतही मला अनेक चित्रपटांत कामे मिळाली.’’ राजा परांजपे यांच्यासह राजा ठाकूर आणि मधुकर ऊर्फ बाबा पाठक या दिग्दर्शकांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभव सांगताना सीमा देव म्हणाल्या, ‘‘मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटातील दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांमुळे अभिनय समृद्ध होत गेला. संजीव कुमार यांच्यासारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते. पण त्यांनी जेव्हा ‘मी तुमचा ‘फॅन’ आहे,’ असे सांगितले तेव्हा खूप हायसे वाटले! राजेश खन्ना देखील गिरगावातील असल्यामुळे त्यांच्याबरोबर अतिशय मोकळेपणाने काम करता आले.’’

आताचे मराठी चित्रपट नक्कीच आशयसंपन्न आहेत, असे त्या म्हणाल्या. नवोदित मराठी तारकांनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करून जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.