06 July 2020

News Flash

अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची पसंती महत्त्वाची – कतरिना कैफ

‘धूम ३’मध्ये आमिर खान आणि आता ‘बँग बँग’मध्ये हृतिक रोशनचाच बोलबाला होणार, हे अपेक्षित असताना कतरिना या चित्रपटांशी जोडली जाण्याचं कारण काय?

| October 5, 2014 01:41 am

‘धूम ३’नंतर वर्षभराने कतरिना कैफ ‘बँग बँग’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘धूम ३’मध्ये आमिर खान आणि आता ‘बँग बँग’मध्ये हृतिक रोशनचाच बोलबाला होणार, हे अपेक्षित असताना कतरिना या चित्रपटांशी जोडली जाण्याचं कारण काय? मुळात, बॉलीवूडमध्ये लंडनहून आली आणि तिखट झाली.. अशीच तिची अवस्था राहिली आहे. अशा स्थितीत तिच्या समकालीन अभिनेत्रींप्रमाणे तिच्या भूमिकेला प्राधान्य देणारे चित्रपट निवडण्यावर भर देणं तिच्यासाठी फायदेशीर ठरलं असतं. मात्र, क तरिना अशा सोप्या सोप्या हिशेबांमध्ये अडकून पडत नाही. माझ्यासाठी बाहेरून येऊन इथे कारकीर्द घडवताना अभिनेत्री म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवणं महत्त्वाचं होतं, असं ती ठामपणे सांगते.
मी सुरुवातीच्या माझ्या मुलाखतींमधून नेहमी सांगायचे की, एक अभिनेत्री म्हणून लोकांनी मला ओळखावं ही माझी इच्छा आहे. मी तेव्हा हेमामालिनीचं नाव घेतलं होतं. त्यांच्याविषयी लोक  फार प्रेमाने बोलतात, आत्मीयतने बोलतात. तसं प्रेम मलाही एक अभिनेत्री म्हणून इथे मिळावं अशी माझी इच्छा होती. ती आजही आहे. इतक्या वर्षांनी एक अभिनेत्री म्हणून मला यश मिळालं असलं तरी त्यात प्रेमाचा भाग किती ते अजूनही मला माहीत नाही. पण बॉलीवूडची एक अभिनेत्री म्हणून मला घराघरात ओळख मिळाली आहे, प्रेक्षकांनी माझा स्वीकार केला आहे हेच माझं यश आहे असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने लोकांची ही मान्यता फार महत्त्वाची होती.. असं कतरिना म्हणते.
‘बँग बँग’मध्ये कतरिना हर्लीन नावाच्या स्वभावाने साध्या तरुणीच्या भूमिकेत आहे. ‘बँग बँग’च्या केंद्रस्थानी चित्रपटाचा नायक राजवीर अर्थात हृतिक रोशन आहे. हे तिलाही माहीत आहे. पण त्यामुळे तिला फारसा फरक पडत नाही, असं ती म्हणते. ‘धूम ३’ किंवा ‘बँग बँग’सारखे चित्रपट निवडताना तुमच्या भूमिकेची लांबीरुंदी मोजण्यात काहीच अर्थ नसतो. या चित्रपटांचा दर्जा, मोठय़ा बॅनरचे व्यासपीठ, चित्रपटाचा आवाका या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात, असे तिने सांगितले. ‘बँग बँग’ हा चित्रपट हॉलीवूडच्या ‘बॉर्न आयडेंटिटी’सारख्या अ‍ॅक्शनपटांशी मेळ खाणारा आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन ही कथेबरोबर पुढे जात राहते. असे चित्रपट आपल्याकडे बनतच नाहीत. त्यामुळे ‘बँग बँग’ हा आपल्यासाठी फार वेगळया शैलीतला चित्रपट होता, असे ती म्हणते.
कतरिनाला आज बॉलीवूडची नंबर एकची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. कारकिर्दीच्या या टप्प्यावर ती खूश आहे का, असं विचारल्यावर नंबर एक वगैरे म्हणताना कलाकारांच्या कामाचे मूल्यमापन वेगवेगळ्या निकषांवर केले पाहिजे, असे मत ती व्यक्त करते. बॉलीवूडमध्ये आता तरी अशी नंबरची स्पर्धा नाही, कारण कधी वर्षभरात तुमचा एखादाच चित्रपट येतो तर कधी तीन-तीन चित्रपट. अशा वेळी लोकोंनी चित्रपटाला किती आणि कसा प्रतिसाद दिला आहे त्याच्यावरून कलाकारांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते आणि ते तसेच के ले गेले पाहिजे, असा आग्रहही ती धरते. म्हणजे तिकीटबारीवरचे यश तिच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही हेही म्हणणं चुकीचं असल्याचं ती सांगते.
प्रत्येकाला आपला चित्रपट चांगला चालावासा वाटतो. कारण तुम्ही त्याच्यावर मेहनत घेतलेली असते आणि मघाशी मी म्हटलं तसं की चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावरूनच प्रेक्षकांनी तुम्हाला किती स्वीकारलं आहे हे तुम्हाला लक्षात येतं. प्रेक्षकांनी आपली योग्य दखल घ्यावी ही प्रत्येक कलाकाराची वाढती भूक असते. मी याही बाबतीत नशीबवान ठरले आहे. माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे तिकीटबारीवरच्या अपयशाची म्हणून जी दुसरी बाजू असते ती मी अद्याप पाहिलेली नाही. मी यासाठी लोकांची खूप ऋणी आहे. शेवटी तुम्ही एका चित्रपटासाठी वर्ष-दीड वर्ष घालवायचं आणि तो आपटला तर नक्कीच मजा नाही येणार कामात.. असं ती हसत सांगते.
बॉलीवूडमध्ये  इतर कोणापेक्षाही अभिनेत्री म्हणून आपला प्रवास हा खूप नशीबवान होता, असं कतरिना मानते. आत्ताही ‘बँग बँग’नंतर सैफ अली खानबरोबरचा ‘फँ टम’ आणि अनुराग बासूबरोबर ‘जग्गा जासूस’ असे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट ती करते आहे. तिच्या मते, आजवर तिने केलेल्या प्रत्येक चित्रपटात तिला कामाचे श्रेय मिळाले. त्यातूनच तिची भविष्यातील वाटचाल सुरक्षित झाली.

तुम्हाला जे काही करायचं आहे, मिळवायचं आहे ते तुमच्या मनात तुम्ही निश्चित केलं पाहिजे. तुम्ही ठरवून जेव्हा त्या पद्धतीने कामाला सुरुवात करता तुम्हाला यश मिळत जातं. अगदी सहकलाकारांबरोबरची ‘पडद्यावरची केमिस्ट्री’सुद्धा त्याला अपवाद नाही. केमिस्ट्री ही कथेत असली पाहिजेच. शिवाय तुम्ही ज्या दिग्दर्शकाबरोबर, युनिटबरोबर काम करता त्यांच्याबरोबर तुम्ही जुळवून घेऊ शकलात तर मग पडद्यावर कथा रंगायला वेळ लागत नाही, मग समोर सलमान असो, रणबीर असो, हृतिक असो किंवा आमिर..

माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे तिकीटबारीवरच्या अपयशाची म्हणून जी दुसरी बाजू असते ती मी अद्याप पाहिलेली नाही. मी यासाठी लोकांची खूप ऋणी आहे. शेवटी तुम्ही एका चित्रपटासाठी वर्ष-दीड वर्ष घालवायचं आणि तो आपटला तर नक्कीच मजा नाही येणार कामात..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2014 1:41 am

Web Title: audience consent important to be an actress katrina kaif
Next Stories
1 बदलणार केव्हा?
2 तेंडुलकरांची ‘कमला’ परत येतेय..
3 सरधोपट
Just Now!
X