दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचे स्पष्ट मत

‘प्रेक्षकांना कळेल की नाही याचा विचार करून प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची गरज नसते. कारण चित्रकर्त्यांपेक्षा प्रेक्षक जास्त हुशार असतात,’ असे स्पष्ट मत दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी मांडले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पिफ फोरमअंतर्गत ‘अंधाधून’ या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या संवादात राघवन बोलत होते.

महोत्सवाचे संयोजक डॉ. जब्बार पटेल आणि प्रा. समर नखाते यांनी श्रीराम राघवन, अभिनेत्री तब्बू, लेखिका आणि संकलक पूजा सुरती, ध्वनी आरेखक मधू अप्सरा यांच्याशी संवाद साधून चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया उलगडली.

‘अंधाधून’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात करण्याविषयीच्या प्रश्नावर राघवन म्हणाले, की मी मूळचा पुण्याचाच असल्याने हे शहर कायमच खुणावते. माझे बालपण सोमवार पेठेत, शिक्षण सेंट विन्सेंट शाळा आणि फग्र्युसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) चित्रपट विषयक शिक्षण झाले. खरेतर ‘अंधाधून’चे चित्रीकरण पुणे, पाँडिचेरी किंवा पणजीत करावे असा विचार होता. मात्र, पुण्याचे रूप पूर्णत बदलण्यापूर्वी येथेच चित्रीकरण करावे या विचारातून पुण्यातच चित्रीकरण करायचे ठरवले.

सध्याच्या राजकीय विषयांवरील चित्रपटांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राघवन यांनी थेट भाष्य करायचे टाळले. ‘मी हे चित्रपट पाहिलेले नाहीत. ते चित्रपट प्रदर्शित होऊन कशी कामगिरी करतात ते पहाणे महत्त्वाचे ठरेल. मी काही राजकीय किंवा प्रेमकथांच्या विरोधात नाही, किंवा मला केवळ थ्रिलर चित्रपटच आवडतात असेही नाही. कदाचित माझा पुढचा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असू शकेल,’ असे त्यांनी सांगितले.

‘मदर इंडिया’, ‘मुघले आझम’, ‘बंदिनी’, ‘सुजाता’, ‘चारुलता’ हे चित्रपट आणि त्यातील स्त्री भूमिका मला खूप भव्यदिव्य वाटतात. त्या काळी अत्यंत ‘पॅशन’ने चित्रपट केल्यानेच हे चित्रपट प्रेक्षकांना इतके भावले.

– तब्बू, अभिनेत्री