विदर्भातील बालकलावंताना दूरदर्शनवरील वाहिन्यांवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात संधी मिळावी या उद्देशाने ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअ‍ॅलिटी शोच्या यशानंतर पुन्हा एकदा हाच कार्यक्रम सुरू होणार आहे. विदर्भातील बालकलावंताना संधी मिळावी या उद्देशाने २१ ऑक्टोबरला नागपूरला या शोसाठी चाचणी घेण्यात येणार आहे.
‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात नागपूरच्या चिन्मय देशकरने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या कार्यक्रमात सहभागी झालेला आदित्य सिंघल शहरात आला होता. लहान मुलांमध्ये चांगले कला गुण असतात मात्र त्यांना अनेकदा व्यासपीठ मिळत नसल्यामुळे ते स्थानिक पातळीवर कार्यक्रम करीत असतात. झीटीव्हीने अशी कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असताना त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण कसे देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. २१ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपासून कामठी मार्गावरील झुलेलाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोराडी रोड, लोणारा या ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे. देशभरात ही प्राथमिक चाचणी घेतली जात असून, प्रत्येक शहरातून कलावंताची निवड केली जाणार आहे.