20 November 2018

News Flash

अवधूत गुप्तेच्या दिग्दर्शनात वैभव तत्ववादी साकारणार भूमिका

चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही

‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘चीटर’ यांसारख्या मराठी चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारणाऱ्या अभिनेता वैभव तत्ववादी याने प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावलेल्या वैभवने बॉलीवुडमध्येही पदार्पण केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीळा भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या गाजलेल्या चित्रपटात वैभवने ‘चिमाजी अप्पा’ ही अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे आत्तापर्यंत विविध भूमिका साकारणारा वैभव कोणत्या नव्या चित्रपटातून पुन्हा समोर येणार याबाबत रसिकांमध्ये बरेच कुतुहल होते.
चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरही चाहत्यांच्या गराड्यात असणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरच अवधूत गुप्तेचे दिग्दर्शन असणाऱ्या एका चित्रपटात दिसणार आहे. याबाबत वैभवने काही दिवसांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करून माहिती दिली होती. या चित्रपटात वैभव एक वेगळीच भूमिका साकारत असून अद्याप त्याच्या चित्रपटातील लूक बद्दल आणि चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. एका वेगळ्याच विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाबाबतची सर्व माहिती लवकरच प्रसारमाध्यमांसमोर येईल अशी माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही वेगळ्या आणि हटके पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे असेही सूत्राकडून समजत आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ असे तरुणाईला साद घालणारे चित्रपट बनवणारा अवधूत गुप्ते कोणता नवीन चित्रपट सादर करणार आहे याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

First Published on August 1, 2016 6:50 pm

Web Title: avadhoot guptes next film with vaibhav tatwawadi