उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट, दर्जेदार अभिनय, उत्तम पटकथा आणि जेम्स कॅमरुन यांचे जबरदस्त दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘अवतार’ या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ इतिहातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून ओळखला जातो. तब्बल २ अब्ज ७८८ कोटी अमेरिकी डॉलर्सची कमाई या चित्रपटाने केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या आगामी चित्रपटाचं नाव ‘अवतार २’ असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण न्यूझिलंडमध्ये केलं जाणार आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अवतारचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. परंतु न्यूझीलंडमध्ये आता परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे परिणामी पुढच्या आठवड्यापासून अवतारचे चित्रीकरण सुरु केलं जाणार आहे. अवतारचे निर्माता Jon Landau यांनी ट्विट करुन ही माहिती प्रेक्षकांना दिली.

‘अवतार’ चित्रपटात २१५४ चा काळ दाखवण्यात आला आहे. मानवाने पृथ्वीवरील संपूर्ण उर्जा संपत्तीचा उपभोग घेतला आहे. आता मानवाला नवीन ऊर्जा स्रोतांची गरज आहे. संशोधन करून मानव ‘पँडोरा’ नामक ग्रहावर पोहोचतो. तेथील अफाट उर्जा स्त्रोत पाहून त्या ग्रहावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान मानव व पँडोरा ग्रहावरील सजीव यांच्यात झालेले युद्ध अवतार मध्ये दाखवण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या भागात जेम्स कॅमरुन काय दाखवणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.