मराठी चित्रपटसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधुत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालं आहे. ‘गॅटमॅट होऊ देना’ असे या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज अशी ख्याती असणाऱ्या अवधुतने हे गाणं गायलं आहे.

तरुणाईला आपल्या तालावर थिरकवायला लावणारं हे गाणं आगामी ‘गॅटमॅट’ चित्रपटाचे शीर्षकगीत असून, येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर अवधुत ‘गॅटमॅट’ च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे खऱ्या अर्थाने रॉकिंग ठरत आहे.

सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना’ या उडत्या लयीच्या गाण्याला समीर साप्तीस्करने चाल दिली असून,अवधुतने ते त्याच्या ‘स्टाईल’ने पडद्यामागे आणि पडद्यावरही गायलं आहे. कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारं हे गाणं साऱ्यांनाच स्फूर्ती देऊन जातं. प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा ‘गॅटमॅट’ हा चित्रपट प्रेमीजोडप्यांसाठी खास असणार आहे. अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केले आहे.

दरम्यान, राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या चित्रपटाच्या निर्मातेपदाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत.