मार्व्हलचा सर्वात मोठा चित्रपट अव्हेंजर्स एंडगेम सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. भारतात पहिल्या पाच दिवसांत या चित्रपटाने तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई करण्याचा विक्रम रचला. सुपरहिरो चाहते मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या किंमतीला तिकीट विकत घेऊन हा चित्रपट पाहात आहे. यावरुनच या चित्रपटाचे चाहत्यांमध्ये असलेले वेड आपल्या लक्षात येते. मात्र, भारतीय स्तंभलेखक शोभा डे यांच्या मते यांना संपूर्ण जगाला वेड लावणारा अव्हेंजर्स एंडगेम हा एक बावळट चित्रपट आहे.

लेखिका शोभा डे आपल्या खळबळजनक स्तंभलेखनामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मार्व्हलच्या सर्वात मोठ्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. अव्हेंजर्स एंडगेम म्हणजे कोट्यवधी डॉलर्स खर्चून प्रेक्षकांसाठी केलेला हा निव्वळ विनोद आहे. तसेच आतापर्यंतचा हा सर्वांत कंटाळवाणा चित्रपट आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांचे ट्विट वाचून अनेक सुपरहिरो चाहते त्यांच्यावर संतापले आहेत. त्यांनी शोभा डे यांच्या ट्विटला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

गेल्या वर्षी अव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनाही मार्व्हल चाहत्यांनी ट्रोल केले होते.