सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. आता चाहते ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची सध्या जगभरात प्रसिद्धी सुरू असून भारतही यात मागे नाही. भारतात मार्व्हल सुपरहिरोपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. या वर्गाला खूश करण्यासाठी आणि चाहत्यांची भेट घेण्यासाठी चित्रपटाचा सहदिग्दर्शक जो रुसो मुंबईत दाखल झाला आहे.

ए. आर. रेहमानने संगीतबद्ध केलेलं ‘मार्व्हल अँथम साँग’ जो रुसोने प्रदर्शित केलं. यावेळी बॉलिवूड चित्रपट, प्रियांका चोप्रा आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स यांच्यात होत असलेली चर्चा आणि इतर गोष्टींवर तो बोलला. त्याचप्रमाणे मुंबईच्या पाणीपुरीचाही आस्वाद त्याने घेतला. जो रुसोचे पाणीपुरी खातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईच्या ‘चाट’चे वेगवेगळे पदार्थ जो रुसोसमोर आहेत आणि तो पाणीपुरीचा मनमुराद आनंद घेताना या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ या चित्रपटाला भारतातील इतर शहरांच्या तुलनेने मुंबईकरांनी भरभरून दाद दिली होती. एकटय़ा मुंबईतच या चित्रपटाने ७० कोटी रुपयांची कमाई केली. या पाश्र्वभूमीवर विचार करता मुंबई ही सुपरहिरोंसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच माव्‍‌र्हल स्टुडिओने मुंबईतूनच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’च्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याआधीच्या भागात खलनायक थेनॉसने पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते तर ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’मध्ये यानंतर काय होते? हे दाखवले जाणार आहे.