‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट २०१९ या वर्षातला सर्वांत मोठा चित्रपट मानला जात आहे. जगभरातून क्रेझ असलेला हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा शेवट कसा असेल हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. त्यामुळे अॅडव्हान्स तिकीट बुकींगसुद्धा जोरदार झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’चा शेवट पाहायचा राहू नये यासाठी लंडनमधल्या एका महिलेनं चक्क तिची प्रसूतीची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे आपला आवडता चित्रपट पाहण्यासाठी चाहते काय काय करू शकतात याचा काही नेम नाही असंच म्हणावं लागेल.

पूर्व लंडनच्या क्लॅपटन इथं राहणाऱ्या जो या गरोदर होत्या. त्यांच्या प्रसूतीची तारीख ही ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’च्या प्रदर्शनाच्या दिवशीची होती. परंतु, प्रसूतीमुळे त्यांना चित्रपट पाहायला मिळणार नसल्याने जो यांनी प्रसूतीची तारीखच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या तिकीटाची अॅडव्हान्स बुकींग त्यांनी केली होती.

”अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट आम्हाला पहिल्याच दिवशी पाहायचा होता. काही आठवड्यांपूर्वीच आम्ही तिकीट बुक केले होते. चित्रपटाचा शेवट काय होणार याची प्रचंड उत्सुकता मला होती. नेमकी त्याच दिवशी माझ्या प्रसूतीची तारीख आली. नंतर मला चित्रपट पाहण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली असती. त्यामुळे मी डॉक्टरांना माझ्या प्रसूतीची तारीख पुढे ढकलण्यास सांगितली,’ असं जो यांनी सांगितलं.

‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाने जगभरातील कमाईचा विक्रम रचला आहे. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने तब्बल १ अब्ज डॉलरहून अधिकचा गल्ला जमवला आहे.