‘अ‍ॅव्हेंजर्स’ एंडगेम हा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जो रुसो यानं केलं होतं. या सुपरहिरोपटामुळे आज तो जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या दिग्दर्शन शैलीची तुलना स्टिव्हन स्पिलबर्ग, ख्रिस्तोफर नोलन, मायकल बे यांसारख्या दिग्दर्शकांशी केली जाते. मात्र त्याला स्वत:ला बॉलिवूड चित्रपटांची शैली खुप आवडते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा जो रुसोचा आवडता अभिनेता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सलमानची तोंड भरुन स्तुती केली. तो म्हणाला, “सलमान माझा आवडता अभिनेता आहे. त्याचा ‘दबंग’ हा चित्रपट मी अनेकदा पाहिला आहे. या चित्रपटातील दिग्दर्शन, कॅमेरा वर्क, अ‍ॅक्शन सीन खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत. सलमानचा पडद्यावरील अभिनय पाहून मला उत्साहित व्हायला होते.” असं म्हणत त्याने सलमानची स्तुती केली.

जोने आजवर ‘चेरी’, ‘द किस’, ‘पीस’, ‘यु मी अँड डुप्री’ यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती मार्व्हलच्या ‘कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर’ या चित्रपटामुळे. त्यानंतर त्याने ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनीटी वॉर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने तर जोला हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टारच केले.