‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा गेल्या वर्षभरातील सर्वाधिक सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. या सुपरहिरोपटाने युरोप-अमेरिकेतच नव्हे तर भारतातही ५०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. एक दोन नव्हे तर तब्बल ३३ सुपरहिरो, विनोदी डायलॉग्स, धमाकेदार स्पेशल इफेक्ट आणि जबरदस्त अॅक्शन सीन्सने भरलेल्या अव्हेंजर्सने जगभरात अक्षरश: धम्माल उडवून टाकली.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. या चित्रपटाने ऑनलाईन तिकिटविक्रीच्या स्पर्धेत ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘वॉर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनाही धुळ चारली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पुढील सहा महिन्यात तब्बल ८० लाख ६० हजार ऑनलाईन तिकिटांची विक्री केली. अ‍ॅव्हेंजर्सने भारतात एकून ५०० कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी ३५० कोटी रुपये त्यांनी केवळ ऑनलाईन तिकिटविक्रीतून मिळवले. यापूर्वी सर्वाधिक ऑनलाईन तिकिट विक्रीचा विक्रम ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’च्या नावावर होता. या चित्रपटाची ५० लाख ७० हजार तिकिटे विकली गेली होती.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा MCU ने निर्माण केलेला आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकाची खरी सुरुवात २००७ साली ‘आयर्नमॅन’ या चित्रपटापासून झाली. त्यानंतर आयर्नमॅन २, अ‍ॅव्हेंजर्स, हल्क, थॉर राग्नारॉक असे एक एक करत त्यांनी तब्बल २२ चित्रपटांची निर्मिती केली. यातील प्रत्येक चित्रपटात कथानक हळूहळू पुढे जात राहिले. आणि अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये नवीन सुपरहिरो येत गेले. अखेर १२ वर्षानंतर MCUने अ‍ॅव्हेंजर्स एंडगेममधून या चित्रपट मालिकेचा शेवट केला.