News Flash

Avengers Infinity War ; थेनॉसचा ‘वैचारिक गोंधळ’

‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मध्ये दाखवण्यात आलेल्या टायटन ग्रहवासीयांची अवस्थादेखील या कांगारूंसारखीच आहे. फक्त इथे ऑस्ट्रेलियन सरकारच्या भूमिकेत खलनायक थेनॉस आहे.

ऑस्ट्रेलिया हा कांगारूंचा देश म्हणून ओळखला जातो; परंतु या देशात कांगारूंची जनसंख्या इतक्या झपाटय़ाने वाढत जाते, की त्याचा त्रास इतर सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागतो. ते शेतात घुसून शेताची नासधूस करतात, रस्त्यांवर चालणाऱ्या गाडय़ांवर अचानक झेप घेतात, घरांच्या छपरांवर चढतात, तर काही उपासमारीमुळे मरतात. आपल्या राष्ट्रीय प्राण्याची अशी दुर्दशा होण्यापेक्षा कांगारूंचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांची जनसंख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, हे ऑस्ट्रेलियन सरकारच्या लक्षात आले आणि यावर उपाय म्हणून काही कांगारूंना मारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज या नियमान्वये ऑस्ट्रेलियात एका वर्षांत हजारो कांगारूंची कत्तल केली जाते. ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या सुपरहिरोपटात दाखवल्या गेलेल्या टायटन ग्रहवासीयांची अवस्थादेखील या कांगारूंसारखीच आहे. फक्त इथे ऑस्ट्रेलियन सरकारच्या भूमिकेत खलनायक थेनॉस आहे.

जन्म आणि मृत्यू एखाद्या तराजूत ठेवलेल्या दोन वस्तूंप्रमाणे आहेत. जर एका पारडय़ात वजन वाढले, तर दुसरे पारडे आपोआप वर जाते; परंतु त्यामुळे तराजूचे संतुलन मात्र बिघडते. अगदी त्याचप्रमाणे जन्म व मृत्यू या दोघांमधील तफावत जर वाढली तर त्याचा थेट परिणाम सजीवांच्या अस्तित्वावर होऊ शकतो. त्यामुळे ब्रह्मांडात सजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जीवन आणि मृत्यू या दोघांत योग्य संतुलन असणे गरजेचे आहे. या विचारसरणीने झपाटलेल्या थेनॉसने सजीवांचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. फेब्रुवारी १९७३ साली’द इनव्हिजिबल आयर्नमॅन # ५५’ कॉमिकमधून थेनॉसच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. थेनॉसचा जन्म टायटन ग्रहावर झाला. या ग्रहावरील सजीव अटर्नल्स प्रजातीचे होते; परंतु थेनॉसच्या शरीरात डेव्हिअन्ट प्रजातीचे डीएनए असल्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा दिसायचा. विचित्र दिसत असल्यामुळे समाजाने नेहमीच त्याचा तिरस्कार केला. सततच्या या अवहेलनेमुळे थेनॉसच्या मनात मृत्यूबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण झाले. थेनॉस लहानपणी फार शांत होता; परंतु सातत्याने होणाऱ्या मानसिक अत्याचारामुळे पुढे त्याचे खलनायकात रूपांतर झाले.

ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ हा आजवरचा सर्वोत्कृष्ट सुपरहिरोपटांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. या तुफान लोकप्रियतेमागे सिंहाचा वाटा आहे तो सुपर खलनायक थेनॉसचा. सर्वसाधारणपणे एखादा खलनायक रंगवताना त्यावर क्रूरतेची झालर चढवली जाते; परंतु थेनॉसची निर्मिती करताना क्रूरतेपेक्षा त्याच्या शक्तिशाली असण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामुळेच बहुधा सुपरहिरोंशी लढताना थेनॉसचे लक्ष त्यांना मारण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेल्या इन्फिनिटी स्टोनकडे जास्त होते. चित्रपटाच्या शेवटी त्याने सर्व इन्फिनिटी स्टोन गोळा करून एका क्षणात अर्धी सजीव सृष्टी नाहीशी केली. या प्रक्रियेत सुपरहिरोदेखील मारले जातात. हा चित्रपट पाहिलेल्या जवळपास प्रत्येकाला आपला लाडका सुपरहिरो मरताना पाहून दु:ख तर झालेच असेल, परंतु थेनॉसबद्दलही मनात कुठे तरी आदर निर्माण होतो. कारण थेनॉस सर्वाना समान न्याय देताना दिसतो. मारताना गरीब व श्रीमंत हा भेद तो करत नाही. तसेच इतर खलनायकांप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या संपत्तीचा लोभ त्याला नाही. शिवाय इन्फिनिटी स्टोनच्या वापरामागे त्याची एक ठाम वैचारिक भूमिका आहे आणि या भूमिकेबाबत तो कुठल्याच प्रकारची तडजोड करताना दिसत नाही. यावरून थेनॉसचा प्रामाणिकपणा आपल्या ध्यानात येतो.

‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ पाहिल्यानंतर अनेकांना थेनॉसच्या प्रवृत्तीमागचा सकारात्मक दृष्टिोन भावला. अगदी आपल्याच देशात आपल्यापैकी अनेकांनी समाजमाध्यमांवर थेनॉसची बाजू उचलून धरली. कारण भारताची अवस्थादेखील टायटन ग्रहापेक्षा वेगळी नाही. आज आपल्या देशाची लोकसंख्या १३३ कोटींपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठय़ा लोकसंख्येला पुरवण्याइतके ऊर्जास्रोत आपल्याकडे नाहीत. रोजगारांच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे बेकारी वाढत आहे. बेकारीमुळे गुन्हेगारी वाढत आहे. विद्यार्थी अधिक व शिक्षणाच्या संधी कमी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील हजारो नागरिक दर वर्षी दारिद्रय़ व उपासमारीचे बळी पडत आहेत. यावर उपाय म्हणून रोजगार हमी योजना, नागरी उपजीविका अभियान, आवास योजना, नागरी पुनरुज्जीवन योजना अशा कित्येक योजना आजपर्यंत सरकारने हाती घेतल्या; परंतु राजकारण, भ्रष्टाचार, अयोग्य नियोजन व अतिरिक्त लोकसंख्येमुळे या सर्व योजना फोल ठरल्या. परिणामी भारतातील आर्थिक व सामाजिक विकासातील संतुलन पार कोलमडले आहे. या पाश्र्वभूमीवर विचार करता थेनॉसने अर्धी लोकसंख्या नष्ट करण्यामागचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. कारण त्यामुळे उर्वरित मंडळींना सुखासमाधानाने जगता येईल ही थेनॉसची प्रामाणिक भूमिका आहे.

वरकरणी पाहता थेनॉसची विचारसरणी कितीही आकर्षक वाटत असली तरी त्यात काही मूलभूत समस्या आहेत. कुठलीही समस्या उद्भवल्यावर आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक – ती समस्या संपवून पुढे जाणे व दोन – ती समस्या सोडवणे. आपल्यापैकी अनेकांना थेनॉसची विचारसरणी आकर्षक वाटते, कारण आपले लक्ष समस्या संपवण्यावर अधिक असते. उदा. आपल्या घरात मच्छर वाढले की सर्वात प्रथम आपण त्यांना हातांनी मारतो; परंतु हातांनी मारून मच्छर काही थांबणार नाहीत हे लक्षात येताच मग आपण रॅकेट, कॉइल, अगरबत्ती, फास्ट कार्ड यांसारखे सोपे पर्याय निवडतो. मच्छरांमुळे होणाऱ्या त्रासापासून या पर्यायांमुळे झटपट मुक्तता मिळते खरी; परंतु हे समस्या समाधान तात्पुरते असते, कारण उर्वरित मच्छर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने आपल्यावर हल्ला करतात आणि हा दिनक्रम असाच रोज महिनोंमहिने सुरू राहतो. कारण इथे समस्या मच्छर नाहीत, तर अस्वच्छ परिसर आहे; परंतु आपले संपूर्ण लक्ष आपण मच्छर मारण्यावर केंद्रित करतो. अगदी थेनॉसप्रमाणेच आपण हा सोपा पर्याय निवडतो, कारण मच्छरांची संख्या कमी झाली तर होणारा त्रासही कमी होईल ही त्यामागील आपली भूमिका असते.

तसेच थेनॉसची समस्या सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्याच नाही तर दिवसेंदिवस कमी होत जाणारे मर्यादित ऊर्जास्रोतदेखील आहेत आणि त्यावर उपाय म्हणून तो प्रत्येक ग्रहावर जाऊन तेथील अर्धी लोकसंख्या मारून टाकतो. थेनॉस आपल्या भूमिकेशी कितीही प्रामाणिक असला तरी त्याच्या या विचारातही काही समस्या आहेत. त्याच्या मते एखाद्या ग्रहावरची अर्धी सजीव सृष्टी नष्ट केली तर उर्वरित मंडळींना ऊर्जास्रोतांचा पुरेसा वापर करता येईल; परंतु हा उपाय फोल ठरतो, कारण ज्या अध्र्या सजीवांना त्याने जिवंत ठेवले आहे पुढे त्यांचीही लोकसंख्या वाढत जाणार आणि पुन्हा एकदा पहिल्या इतक्याच ऊर्जेचा वापर सुरू होणार, शिवाय कुठलीही सभ्यता जसजशी विकसित होत जाते तसतसा त्यांच्या ऊर्जेचा वापरही वाढत जातो. उदा. अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या केवळ ४.४ टक्के आहे आणि ही इवलीशी लोकसंख्या जगाच्या तुलनेत २६ टक्के खनिज तेल वापरते. थेनॉसच्या मानसिकतेतून विचार करता अमेरिकेची लोकसंख्या फार कमी असल्यामुळे त्यांनी कमी ऊर्जा वापरणे अपेक्षित आहे; पण इथे त्याचे लोकसंख्येचे गणित चुकते, कारण अमेरिका इतरांच्या तुलनेत जास्त विकसित असल्यामुळे या देशात वापरले जाणारे तंत्रज्ञान इतर देशांपेक्षा अद्ययावत आहे. परिणामी ते अधिक ऊर्जास्रोतांचा वापर करतात. इथे समस्या मर्यादित ऊर्जास्रोत किंवा सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या नाही, तर अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा कमी वापर होय. आपण पृथ्वीवासी सूर्यापासून मिळणाऱ्या केवळ १५ टक्के ऊर्जेचा वापर करतो. जर हा वापर आपण वाढवला तर आपल्याला ऊर्जेची टंचाई सहज भरून काढता येऊ शकते.

थेनॉस शक्तिमान आहे. इतका की सूर्यापेक्षा चौपट मोठय़ा ताऱ्याची संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात शोषून घेणाऱ्या थॉरलादेखील तो हरवू शकतो. शिवाय तो आपल्या तत्त्वांशी प्रामाणिकदेखील आहे. तरीही निर्मात्यांनी थेनॉसला खलनायकाच्याच भूमिकेत रंगवला आहे. कारण त्याचा वैचारिक गोंधळ, चुकीचे तर्कशास्त्र व त्यातून निर्माण झालेली संकुचित प्रवृत्ती होय; परंतु आपल्या समाजाला थेनॉसची नाही तर अ‍ॅव्हेंजर्स सुपरहिरोंची गरज आहे, ज्यांना समस्या संपवण्यात नाही तर सोडवण्यात जास्त रस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 3:13 am

Web Title: avengers infinity war thanos is most charismatic marvel supervillain by mandar gurav
Next Stories
1 कसोटी वाहिन्यांची आणि प्रेक्षकांचीही
2 ‘कथेमागचा दृष्टिकोन महत्त्वाचा’
3 गाण्याचं नाव..
Just Now!
X