‘गेली ४९ वर्षे प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘आविष्कार’ या नाटय़संस्थेचे प्रायोगिक रंगकार्यासाठी हक्काचे घर मिळवण्यासाठीचे अथक प्रयत्न आता फलद्रुप होण्याची आशा निर्माण झालेली आहे. लवकरच यासंबंधात आम्ही गोड बातमी देऊ,’ अशी ग्वाही ‘आविष्कार’च्या नवनिर्वाचित अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी रोहिणी हट्टंगडी यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना दिली.

‘आविष्कार’चे नुकतेच दिवंगत झालेले अध्यक्ष अरुण काकडे यांनी आयुष्यभर ध्यास घेतलेल्या या स्वप्नाची संस्थेच्या येत्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत काहीही करून पूर्तता करण्याचा दृढ निर्धार संस्थेच्या नव्या कार्यकारी मंडळाने केला असून, सरकारकडून त्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ‘आविष्कार’चे दीपक राजाध्यक्ष यांनी सांगितले. पृथ्वी थिएटरच्या धर्तीवर हे बहुउद्देशीय नाटय़संकुल असावे अशी संकल्पना आमच्या डोळ्यांसमोर आहे, असे ते म्हणाले.

प्रसिद्ध नाटय़-दिग्दर्शक व ‘आविष्कार’च्या सल्लागार मंडळाचे सदस्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, आजवर अनेक कलावंतांना व सांस्कृतिक संस्थांना सरकारने त्यांच्या कलासंस्थांच्या उभारणीसाठी वा कार्यासाठी भूखंड दिलेले आहेत. त्यापैकी काहींचा वापर खासगी व्यावसायिक हेतूसाठीदेखील करण्यात येत आहे. मात्र, ‘आविष्कार’ उभारू इच्छित असलेले हे नाटय़संकुल केवळ स्वत:साठी नसेल, तर समस्त प्रायोगिक-समांतर रंगकर्मीसाठी आणि विविध नाटय़विषयक उपक्रमांसाठीचे असेल. काकडेकाकांनी छबिलदास रंगमंच व त्यानंतर ‘आविष्कार’चा मंच नेहमीच सर्वाना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्यभराचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही समस्त रंगकर्मी प्रयत्न करणार आहोत.

या पत्रकार परिषदेला ‘आविष्कार’च्या नव्या कार्यकारी मंडळाचे सदस्य दिग्दर्शक विजय केंकरे, अजित भगत, रवि सावंत, विश्वास सोहोनी आदी नाटय़कर्मी उपस्थित होते. ‘रंगायन’ व ‘आविष्कार’ या संस्थांमध्ये हयात घालविलेल्या कै. काकडेकाका यांच्या स्मृतीस्तव मंचावरील त्यांची खुर्ची रिक्त ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी ‘आविष्कार’च्या ३३ व्या अरविंद देशपांडे स्मृती नाटय़महोत्सवाची घोषणा करण्यात आली. ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालय ऑडिटोरियममध्ये रोज संध्याकाळी ७ वा. होणार आहे. महोत्सवाची सुरुवात रविवार, ९ फेब्रुवारी रोजी गायक आनंद भाटे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होईल. सोमवार, १० फेब्रुवारीला महानगरपालिका कर्मचारी कलावंत संस्था, कलासाधना, मुंबई निर्मित ‘व्हाइट पेपर’ हे इरफान मुजावर लिखित व बुद्धदास कदम दिग्दर्शित नाटक सादर होईल. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी अस्तित्व, मुंबई निर्मित आणि मिती चार, कल्याण प्रस्तुत ‘लोकोमोशन’ हे नाटक पेश होईल. त्याचे लेखन स्वप्नील चव्हाण यांनी केले असून, रवींद्र लाखे यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. बुधवार, १२ फेब्रुवारीला भालचंद्र कुबल लिखित व राम दौंड दिग्दर्शित ‘चवीपुरतं’ या ‘शब्दांकित’ संस्थेच्या नाटकाचा प्रयोग होईल.  गुरुवार, १३ फेब्रुवारीला मामा वरेरकर लिखित व विश्वास सोहोनी रंगावृत्तीत व दिग्दर्शित ‘भूमिकन्या सीता’ नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाची सांगता होईल. ‘आविष्कार’ संस्थेने धि गोवा हिंदु असोसिएशन कला विभागाच्या सहयोगाने या नाटकाची निर्मिती केली आहे.