कलाकार म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा समाजामध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी झाला, लोकांमध्ये नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर झाले आणि त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नेत्रदानासाठी अर्ज भरले तर त्याचा फायदा समाजालाच होणार आहे. याच सामाजिक भावनेतून अभिनेता प्रशांत दामले यांनी नेत्रदानाचा प्रचार-प्रसार करण्याचे काम ‘डोळस’पणे हाती घेतले आहे. यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. प्रशांत दामले यांच्या नव्या ‘नकळत दिसले सारे’ या नाटय़प्रयोगादरम्यान उपस्थित प्रेक्षकांना आवाहन करून त्यांच्याकडूनही नेत्रदानाचे अर्ज भरून घेण्यात येत असून आत्तापर्यंत एक हजारांहून अधिक अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
रंगभूमीवर ‘नकळत दिसले सारे’ या नाटकाचे प्रयोग सुरू असून त्यात प्रशांत दामले यांनी अंध व्यक्तिरेखा साकारली आहे. आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा त्यांची या नाटकातील ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. या वेगळ्या ‘भूमिके’बरोबरच दामले यांनी नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी ‘जागल्या’ची भूमिकाही ते पार पाडत आहेत. जन्मत: अंध असलेली व्यक्ती आणि वयाच्या ४०-४५ व्या वर्षांनंतर अंधत्व आलेली व्यक्ती यांच्यावर हे नाटक आहे. जन्मत: अंधत्व आलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अंधत्व आल्यानंतर त्याला जीवनाकडे पाहायला कसे शिकविते, असे नाटकाचे कथानक आहे.
नाटकाचा मुहूर्त जेव्हा झाला तेव्हा प्रशांत दामले यांनी नाटकांच्या प्रयोगादरम्यान उपस्थित प्रेक्षकांकडून नेत्रदानाबाबत अर्ज भरून घेण्यात येतील. तसेच शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेळी आपण स्वत: नेत्रदानाचा अर्ज भरू, असे सांगितले होते. त्यानुसार गेल्या आठवडय़ात डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. या प्रयोगास ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. डॉ. लहाने यांच्या उपस्थितीत प्रशांत दामले यांनी नेत्रदानाचा अर्ज भरलाच पण या वेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी ४११ लोकांनी नेत्रदानासाठीचे अर्ज भरले.
या नंतर नाटकाचा दुसरा प्रयोग दादर येथे शिवाजी मंदिरला तर त्यापुढचा प्रयोग ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात झाला. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ४८४ आणि २३६ अर्ज भरून घेण्यात आले. आत्तापर्यंत झालेल्या प्रयोगादरम्यान एकूण १ हजार १३१ लोकांनी हे अर्ज भरून नेत्रदानाच्या चळवळीला आपला प्रतिसाद दिला आहे. मरणोत्तर नेत्रदान ही एक सामाजिक चळवळ असून समाजात जनजागृती करण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘नकळत दिसले सारे’च्या प्रत्येक प्रयोगाच्या वेळी उपस्थितांकडून नेत्रदानाबाबतचे अर्ज भरून घेण्यात येतील, असे प्रशांत दामले यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
नाटकही मार्गदर्शक ‘नकळत दिसले सारे’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेत्रदानाबाबतचे अर्ज प्रेक्षकांकडून भरून घेण्यात येत आहेत. प्रशांत दामले यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच या नाटकात ज्या लोकांना विशिष्ट वयानंतर अंधत्व येते, त्यांनी नेमके काय केले पाहिजे, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. सामाजिक प्रश्नावर अशा प्रकारची नाटके यापुढेही आली पाहिजेत.
डॉ. तात्याराव लहाने, नेत्र शल्यविशारद