बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानासह ‘बाला’ चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना पोलीसांनी समन्स बजावला आहे. त्यांना चौकशीसाठी ठाणे पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे. त्यांच्याविरोधात केलेल्या फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांना बोलावण्यात आले आहे.

आयुषमानसह निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक अमर कौशिक यांना काशिमीरा पोलीस ठाण्यातून चौकशीपात्र पाठवण्यात आले आहे. मीरा रोड येथे राहण्याऱ्या दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी या तिघांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, चंद्रा यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आयुषमानला व्हाट्सअॅपवर स्क्रिप्ट पाठवली होती. त्याने ती परस्पर दिनेश व्हिजन व अमर कौशिक यांना पाठवली व त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली. यामुळे चंद्रा यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. “आयुषमानचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले आहे” असे चंद्रा यांनी सांगितले.

“त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना इथे बोलावले आहे. त्यांना चौकशीपत्र पाठवण्यात आले असून लवकरात लवकर ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहतील.” असे पोलिसांनी सांगितले. “जर ते उपस्थित राहले नाहीत तर त्यांना या तक्रारीसंबंधात काहीही बोलायचं नाहिये असं समजून योग्य ती कारवाई केली जाईल.” असेही ते म्हणाले.

मार्च महिन्यामध्ये कमलकांत चंद्रा यांनी चित्रपट निर्माते दिनेश विजान व दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यावर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धावही घेतली होती. मात्र न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच ‘बाला’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे त्यांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन कलम ४२०(फसवणूक) आणि कलम ४०६(विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे