‘सगळे टाळ्या वाजवणार..’ हा अभिनेता आयुषमान खुराणाच्या तोंडचा मराठी संवाद एव्हाना कित्येकांनी ‘हवाईजादा’च्या प्रोमोजमध्ये ऐकला असेल. हा एक मराठी संवाद म्हणताना आयुषमानच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्याचे कारण म्हणजे मूळचा चंदीगढचा असलेला हा खुशालचेंडू पंजाबी तरुण. चंदीगढमध्येच लहानाचा मोठा झाला. शिक्षण संपल्यानंतर कारकीर्द घडत गेली तशी तो व्हाया दिल्ली मुंबईत पोहोचला. एवढा प्रवास क रून मी मुंबईत स्थिरावलो आहे. आपण ज्या शहरात राहतो ती भाषा आली पाहिजे हे खरंच आहे. पण, मराठी बोलण्याचा अथक प्रयत्न करूनही माझ्या उच्चारातला मूळ पंजाबी हेल काही जात नाही.. असं आयुषमान हसत हसत सांगतो. त्या आणि बाकी सगळ्याच अर्थाने दिलसे ‘पंजाबी मुंडा’ असलेल्या आयुषमानने अगदी मेहनतीने मराठमोळे ‘शिवाकर बापूजी तळपदे’ साकारायचा प्रयत्न केला आहे. आणि या प्रयत्नांना प्रेक्षक ‘टाळ्या वाजवून दाद देतील’, अशी आशाही तो मनी बाळगून आहे..
गेलं वर्ष आयुषमानसाठी वाईट ठरलं आहे. यशराज प्रॉडक्शनचा चित्रपट, आत्ताच्या पिढीचा ‘कॉर्पोरेट’ प्रश्न हाताळणारा विषय, जोडीला सोनम कपूर आणि ऋषी कपूरसारखे दमदार कलाकार असूनही त्याचा ‘बेवकूफियाँ’ हा चित्रपट सपशेल आपटला. एक अभिनेता म्हणून हा चित्रपट निवडून कोणतीही ‘बेवकूफी’ मी केली नव्हती. पण, का कोण जाणे लोकांना तो चित्रपट आवडला नाही आणि वर्षभरासाठी ‘अपयशी’ असा शिक्का बसला, अशी खंत आयुषमान व्यक्त करतो. हिंदी चित्रपटसृष्टी आणि आजचा प्रेक्षक हे अजब रसायन असल्याचं तो सांगतो. मुळात, टीव्ही ते रुपेरी पडदा अशा यशस्वी प्रवास करणारा कलाकार म्हणून आजच्या काळात आयुषमान खुराणाचं नाव घेतलं जातं. ‘विकी डोनर’ हा त्याचा पहिलाच चित्रपट खूप चांगला चालला. अभिनेता म्हणून आयुषमान वरच्या फळीत सहज जाऊन बसला. तो एक चांगला अभिनेता आहे, यात कुणालाही शंका नाही. पण, तुमच्या चित्रपटातून ते प्रतित झालं नाही तर त्याला काही अर्थ नसतो. जे आपल्याबाबतीत झालं आहे, असं आयुषमानला वाटतं. ‘विकी डोनर’ नंतर त्याने दोनच चित्रपट केले. यू टीव्हीचा ‘नौंटकी साला’ आणि यशराजचा ‘बेवकूफियाँ’ हे दोन्ही चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत. आशय-विषय सगळ्याच बाबतीत हे चित्रपट दर्जेदार होते. पण, कुठेतरी ते गणित जमून आलेलं नाही. आणि म्हणूनच एकटय़ा ‘विकी डोनर’च्या यशावर आपल्याला यशस्वी अभिनेता म्हणून स्थिरावता येणार नाही, असं तो ठामपणे सांगतो. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच विभू पुरी दिग्दर्शित ‘हवाईजादा’ हा आपला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ‘हवाईजादा’मुळे अगदी वेगळी व्यक्तिरेखा आपल्याला स्वीकारायला मिळाली, असं तो म्हणतो. राइट बंधूंच्याही आधी आपल्याकडे मुंबईसारख्या शहरात कोणीतरी विमान बनवून ते उडवण्याचा प्रयत्न केला होता ही आपल्यासाठी अजूनही कल्पनेतलीच गोष्ट राहिली आहे. कोण कुठला शिवाकर बापूजी तळपदे नावाचा तरुण केवळ पुस्तकांच्या आधारावर सतत प्रयोग करत काहीतरी भव्यदिव्य बनवू पाहात होता. त्याने ती गोष्ट बनवूनही दाखवली. मात्र, त्याची ती गोष्ट इतिहासातच कुठेतरी हरवली. त्याचा यशस्वी प्रयत्न फारसा लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. ‘हवाईजादा’ या चित्रपटातून पहिल्यांदा त्यांची ही कथा इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोकांसमोर येणार आहे, याचा आपल्याला जास्त आनंद होत असल्याचे त्याने सांगितले. राइट बंधूंच्याही आधी एका भारतीयाने विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता, ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगणाऱ्या आयुषमानला प्रत्यक्षात त्याच भारतीयाची भूमिका साकारताना फार मेहनत घ्यावी लागली आहे. शिवाकरजींची व्यक्तिरेखा साकारणं हे एकप्रकारे आव्हानही होतं आणि म्हटलं तर थोडंसं सोप्पंही गेलं असं तो म्हणतो. शिवाकर बापूजी तळपदे या माणसाबद्दल फार थोडे संदर्भ आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांची छायाचित्रेही नाहीत. त्यामुळे थोडय़ाफार माहितीवरूनच त्यांची व्यक्तिरेखा बांधावी लागली आहे. म्हणून वास्तवाचा आधार घेत, पण एका परीकथेच्या मांडणीतून या ऐतिहासिक ‘हवाईजादा’ची कथा सांगण्याचा निर्णय दिग्दर्शक विभू पुरी यांनी घेतला. त्यामुळे एक मराठी भाषा सोडली तर एखाद्या वास्तव व्यक्तीची तितकीच वास्तव प्रतिमा रंगवण्याचं एक मोठं आव्हान असतं ते आपल्याबाबतीत घडलं नाही, असं तो म्हणतो. पण, तरीही ही भूमिका अवघड आहे. कारण, त्या काळातील संदर्भाचा धागा जुळवत ते असे वागले असतील, तसे बोलले असतील असे आडाखे बांधून दिग्दर्शकाशी चर्चा करून ती भूमिका रंगवावी लागते जे या चित्रपटाच्या बाबतीत झाले, असं आयुषमानने सांगितलं.
या चित्रपटातला प्रत्यक्ष विमान उडवण्याचा प्रसंग सगळ्यात मस्त जमून आला आहे, असं तो सांगतो. हा प्रसंग खरा घडलेला आहे आणि त्यावेळी कित्येकांनी तो पाहिला आहे, त्याचे वर्णनही लिहून ठेवले आहे. त्यामुळे ते दृश्य साकारताना खूप समाधान मिळाल्याचे त्याने सांगितले. दोन ते तीन चित्रपट आणि तेवढीच वर्ष म्हणजे फार अपयशावर विचार करू नये.. हे त्याला पटत नाही. तुम्ही किती जुने आहात याचा विचार करणं परवडणारं नाही. तुम्हाला फार विचारपूर्वक आपले चित्रपट निवडावे लागतात, असं तो म्हणतो. मी हिंदी चित्रपटांचा ‘टिपिकल’ हिरो नाही आणि मला तसे चित्रपट करायचेही नाहीत. ‘बेवकूफियाँ’ मध्ये तो प्रकार आपण केलाही. पण, आता मीच माझ्या चॉकलेटी चेहरा आणि हसरी पंजाबी वृत्ती असलेला तरुण या साच्यात अडकलोय की काय असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे भविष्यात मी ही चूक करणार नाही, असं तो सांगतो. यावर्षी तो यशराजच्याच ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपटही वेगळा असल्याचे त्याने सांगितले. त्याची कथाच सुंदर आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर या नवोदित अभिनेत्रीबरोबर तो काम करतो आहे. मात्र, व्यावसायिक चित्रपटांच्या प्रवाहात राहून वेगळे चित्रपट करणं हेच आपल्यासमोरचं खरं आव्हान आहे, असं तो सांगतो. ‘हवाईजादा’ ही आपल्यासाठी नवीन सुरुवात ठरेल, अशी अपेक्षाही तो व्यक्त करतो.