आयुषमान खुरानाचा सुपरहिट चित्रपट ‘अंधाधून’ हा लवकरच चीनमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आयुषमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. अनेक विक्रम या चित्रपटानं मोडले होते. विशेष म्हणजे २०१८ मध्ये तिन्ही खानचे चित्रपट फ्लॉप झाले असतानाही आयुषमानचा लो बजेट ‘अंधाधून’ प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला.

हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती व्हायाकॉम १८ नं ट्विटरवर दिली आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे. अंधाधून ‘पियानो प्लेअर’ नावानं प्रदर्शित होणार आहे.  चीनमध्ये गेल्या वर्षभरापासून भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसून येत आहे. यापूर्वी आमिर खानच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग चीनमध्ये होता. आमिरचे चित्रपट भारतापेक्षाही चीनमध्ये सर्वाधिक कामाई करायचे आता इतरही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘बजरंगी भाईजान’, ‘हिचकी’, ‘हिंदी मिडीअम’ यांसारखे चित्रपट वर्षभरात चीनमध्ये प्रदर्शित झाले या चित्रपटांना चांगली पसंती लाभली.

‘अंधाधून’बरोबर श्रीदेवी यांचा ‘मॉम’ हा चित्रपटदेखील चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. या दोन्ही चित्रपटांना चीनमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे आता पाहण्यासारखं ठरेल .