‘अंधाधून’, ‘बधाई हो’ या सारख्या गाजलेल्या चित्रपटातून नावारुपाला आलेला अभिनेता आयुषमान खुरानाचा आज ३५ वा वाढदिवस. २०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याने ७ वर्षांच्या करिअरमध्ये स्वत: ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळे आज तो त्याच्या अभिनय आणि उत्तम चित्रपटांसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे आयुषमान या नावाने सर्व परिचित असलेल्या या अभिनेत्याचं खरं नाव वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

आयुषमानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगढमध्ये झाला. जन्मावेळी त्याचं नाव निशांत खुराना असं ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतर तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या नावात बदल करुन आयुषमान असं ठेवलं. आयुषमानला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. १७ व्या वर्षी त्याने एका टिव्ही रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर २००४ मध्ये तो ‘रोडिज २’मध्ये झळकला. आवड जोपासत असतानाच त्याचे शिक्षणाकडेही लक्ष दिलं. आयुषमानने मास कॉम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं असून सोबत त्याने पाच वर्ष थिएटरही केलं.

दरम्यान, ‘रोडिज२’नंतर त्याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचं सूत्रसंचालनदेखील केलं. विशेष म्हणजे या साऱ्या प्रवासानंतर तो २०१२ मध्ये विकी डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकला. त्यानंतर दम लगा के हईशा, बरेली की बर्फी, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’ आणि बधाई हे चित्रपट केले.