News Flash

मॅच फिक्सिंगमधील दडलेल्या गोष्टींचा पट..

मोहम्मद अझरुद्दीनवर चित्रपट बनवावा, ही माझी कल्पना नव्हती; पण मी स्वत: त्याचा खूप मोठा चाहता आहे

स्पॉटबॉय म्हणून १४ व्या वर्षी चित्रपटसृष्टीला जवळून पाहणारा टोनी डिसूझा आज दिग्दर्शक म्हणून ‘अझर’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. ‘अझर’ हा या दिग्दर्शकाचा तिसराच चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट म्हणजे एके काळी भारतीय क्रिकेट संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा आणि रातोरात असंख्य क्रिकेटप्रेमींच्या नजरेत खलनायक ठरलेल्या मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावरचा चरित्रपट नाही. त्याच्या कारकीर्दीत आलेल्या ‘मॅच फि क्सिंग’नामक वादळामागे दडलेली अनेक गुपिते उलगडणारा हा चित्रपट आहे, असे टोनी डिसूझा सांगतात.

मोहम्मद अझरुद्दीनवर चित्रपट बनवावा, ही माझी कल्पना नव्हती; पण मी स्वत: त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याच्यावरच्या प्रेमातूनच पुढे चांगली मैत्रीही झाल्याचे टोनी म्हणतात. दिल्लीत असताना एका मंत्र्याशी माझी भेट झाली. त्यांना मी अझरची भेट घडवून आणण्याची विनंती केली होती. तेव्हा मी कधी तरी चित्रपट दिग्दर्शक बनेन आणि अझरवर चित्रपट करेन, अशी साधी कल्पनाही केली नव्हती. तरुण होतो, त्याच्या खेळाचा निस्सीम चाहता होतो आणि त्याची केवळ एक स्वाक्षरी मला हवी होती; पण त्या एका भेटीने माझी आणि त्याची घट्ट मैत्री झाली जी आजवर टिकून आहे. त्यामुळे आता जेव्हा मला बालाजी प्रॉडक्शनकडून अझरवर चित्रपट करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा मी ही संधी सोडूच शकत नव्हतो, असे टोनीने स्पष्ट केले. मात्र काहीही झाले तरी अन्य दिग्दर्शकांप्रमाणे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा चरित्रपट आहे, असे सांगण्याचा खोटेपणा मी करणार नाही. अझरच्या आयुष्यात घडलेल्या काही वास्तव घटनांचा माग या चित्रपटात आहे आणि त्या संदर्भातून येणाऱ्या त्याच्या आयुष्याच्या, कारकीर्दीच्या गोष्टी ओघाने चित्रपटात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

‘अझर’ चित्रपटाची कल्पना ही खुद्द एकता कपूरची होती. मोहम्मद अझरुद्दीन हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. आता ही ओळख महेंद्रसिंग धोनीला मिळाली आहे, पण नव्वदच्या दशकात यशाच्या शिखरावर असणारा हा खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या अझरने त्या दिवशीही शतकी खेळी केली होती. पुढच्या सामन्यांच्या वेळीही तोच कर्णधार असणार याबद्दलची चर्चा होती. त्याच वेळी तिकडे हॅन्सी क्रोनिएने किंग कमिशनसमोर मॅच फिक्सिंग प्रकरणात अझरचे नाव घेतले आणि एका रात्रीत देशाचा हा हिरो खलनायक ठरला. त्याची कारकीर्द संपली, खेळाडू म्हणून त्याच्याबद्दल असणारा आदर संपला. माझ्या मते ही खूप चुकीची गोष्ट होती, असे टोनी सांगतात. २००६ मध्ये न्यायालयाने अझरुद्दीनला या प्रकरणी क्लीन चिट दिली. त्यांच्या या निर्णयाचा आदर आहे. मात्र एका चांगल्या खेळाडूला बदनामीच्या अंधारात फे कणाऱ्या या घटनेमागचे सत्य नेमके काय होते हे कधी पाहिले गेले नाही. ‘अझर’मध्ये या सगळ्याचा धांडोळा घेतला असल्याचे टोनीने सांगितले. मात्र हा चित्रपट म्हणजे एक  प्रकारे अझरला पूर्णपणे निर्दोष म्हणून जगासमोर आणण्याचा प्रयत्न तर नाही ना? या प्रश्नावर चित्रपट पाहिल्यावर हा अझरच्या बाजूने मांडलेला चित्रपट नाही हे तुमच्या लक्षात येईल, किंबहुना म्हणूनच तो त्याचा गौरव करणारा चरित्रपट नाही हे आपण सांगतो आहोत, याकडेही टोनीने लक्ष वेधले. अझरुद्दीनने आयुष्यात ज्या चुका केल्या त्याही या चित्रपटातून समोर येणार असल्याचे

त्यांनी सांगितले.  एखाद्या जिवंत व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणे हे एक मोठे आव्हान असते. अझरुद्दीनच्या संदर्भात मॅच फिक्सिंगसह त्याच्या आयुष्यातील रोमहर्षक क्षणांना कॅमेऱ्यात चित्रित करणाऱ्या या चित्रपटासाठी इम्रान हाश्मीची तयारी खूप महत्त्वाची आणि अवघड होती, असे टोनीने सांगितले. अझरुद्दीन हा स्टायलिश खेळाडू आहे. त्याची बॅटिंग करण्याची पद्धत, फिल्डिंग या सगळ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांना आवडणाऱ्या आणि आजही लक्षात राहतील अशा आहेत. त्यामुळे इम्रानला त्याच्यासारखी बॅटिंग करायला लावणे हे आमच्यासमोरचे आव्हान होते. इम्रान स्वत: एक ‘अभ्यासू अभिनेता’ आहे. त्यामुळे त्याने खूप मेहनत घेतली आहे. कुठलाही कलाकार सगळे सोडून केवळ एका चित्रपटावर दीड वर्ष मेहनत करत नाही. इम्रानने ते केले, या शब्दांत टोनीने त्याचे कौतुक केले. मात्र या सगळ्यासाठी अझरुद्दीनने स्वत: मोलाची मदत केली असल्याचे टोनीने सांगितले. सुरुवातीचे सहा महिने आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ अझरुद्दीनबरोबर वावरत होतो. सकाळी उठलो की, अझरुद्दीनबरोबर क्रिकेटच्या सरावासाठी मी आणि इम्रान पोहोचायचो. त्यानंतर पूर्ण दिवसभर त्याचे खाणे-पिणे, वावर, बोलणे, खेळ या सगळ्याचे निरीक्षण करत राहायचो. एका क्षणी या सगळ्या प्रकाराला अझरुद्दीन इतका कंटाळला होता की, मला हा चित्रपट नको, पण तुम्ही इथून निघून जा, असे त्याने आम्हाला सुनावले होते. मुंबईतही शिवाजी पार्कमध्ये तो खात बसलेला असताना आम्ही त्याच्याकडे पाहात होतो, तेव्हा निदान मला पोटभर खाऊ द्या.. अशी विनवणी करण्याची वेळ त्याच्यावर आली होती, अशी मिस्कील आठवणही टोनीने सांगितली. कुठलाही आडपडदा न ठेवता अझरुद्दीनने या चित्रपटासाठी जे जे आवश्यक होते ती सगळी माहिती दिल्याची टोनीने सांगितली.

‘अझर’ची कथा रजत अरोरा या प्रसिद्ध लेखकाने लिहिली आहे. चित्रपटात अझरचे दोन्ही विवाह, त्याच्या पत्नी हा तपशीलही तितकाच सविस्तरपणे आला आहे. यात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीची- नौरीनची भूमिका प्राची देसाईने केली असून संगीता बिजलानीच्या भूमिकेत नर्गिस फाखरी आहे, तर मॅच फि क्सिंग संदर्भातील न्यायालयीन प्रकरणही यात आहे. त्यात सरकारी वकिलाची भूमिका लारा दत्ताने, तर अझरुद्दीनच्या वकिलाची रेड्डीची भूमिका कुणाल रॉय कपूरने केली असल्याची माहिती टोनीने दिली. एक चांगला खेळाडू जेव्हा अशा एखाद्या प्रकरणात बदनाम होतो तेव्हा त्याचे परिणाम त्याच्या वैयक्तिक, वैवाहिक आणि सामाजिक आयुष्यात कशा पद्धतीने होत असतील, याचा विचार आपण सहसा करत नाही. मॅच फिक्सिंगनंतर अझरुद्दीनच्या आयुष्यात काय वादळे आली, याचेही चित्रण चित्रपटात आहे. नऊ हा आकडा अझरुद्दीनसाठी भाग्यवान आकडा आहे. तो ९९ कसोटी सामने खेळला आहे, तर ९० एकदिवसीय सामने त्याने जिंकले आहेत. कसोटीत त्याचा १९९ धावांचा  विक्रम आहे.. या सगळ्या गोष्टींमुळे ९ हा आकडा त्याच्यासाठी खूप जवळचा आहे. एखादी गोष्ट आवडल्यानंतर ती स्वत:कडे असावी म्हणून वाटेल तसा खर्च करणारा अझर अशा वेगळ्या आणि आजवर अनेकांच्या अनुभवातून दिसलेला अझरही या चित्रपटात दिसेल, असे टोनी सांगतात. या चित्रपटामुळे दिग्दर्शक म्हणून आपली ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशाही टोनी यांना वाटते आहे. अमेरिकेत फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतलेल्या टोनीने आजवर जाहिराती आणि अनुबोधपटांसाठी कोम केले आहे. त्या वेळी जॉन अब्राहमशी झालेल्या ओळखीतून अक्षयकुमार, ए. आर. रेहमान अशी मंडळी जमवत ‘ब्लू’ हा पहिला चित्रपट आपण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जॉन त्या वेळी काम करू शकला नाही. पहिले अंडरवॉटर चित्रीकरण असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला. आजच्या काळात तो चित्रपट केला असता तर जास्त यशस्वी ठरला असता, असे टोनीला वाटते. त्यानंतर अक्षयकुमारबरोबर ‘बॉस’ हा चित्रपट टोनीने दिग्दर्शित केला. अक्षयकुमारला गुरू मानणाऱ्या टोनीचा तिसरा चित्रपट ‘अझर’ तिकीटबारीवर नशीब अजमावणार आहे. या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून तो लोकांना आवडेल, असा विश्वास टोनीने व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:52 am

Web Title: azhar movie review
Next Stories
1 जागीच घुटमळणारे ‘स्ट्रॉबेरी’  
2 मुंबईत बालचित्रपटांचा ‘समर बोनान्झा’
3 रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ‘माव्‍‌र्हल’च्या प्रेमात
Just Now!
X