20 November 2017

News Flash

कोणाच्या खांद्यावर राणा डग्गुबतीचे ओझे!

राणा डग्गुबतीचा विमान प्रवासातील किस्सा

ऑनलाइन टीम | Updated: March 20, 2017 4:32 PM

बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागात राणा डग्गुबतीची अशी झलक पाहायला मिळाली होती.

चित्रपट रसिकांमध्ये सध्या ‘बाहुबली २’ चित्रपटाविषयी अनेक चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. बहुप्रतिक्षित ‘बाहुबली २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटासंदर्भातील प्रत्येक गोष्ट लोकांना आकर्षित करत असताना त्यातील कलाकारांच्या लोकप्रियतेमध्येही चांगलीच वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळेच सध्या यातील मुख्य कलाकार राणा डग्गुबतीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विमानाने प्रवास करताना राणा डग्गुबती सहप्रवाशाच्या खांद्यावर डोके ठेवून डुलकी घेत असल्याचे फोटोमध्ये दिसते. हा प्रवासी दुसरा तिसरा कोणी नसून, नागार्जुनचा मुलगा आणि दाक्षिणात्य अभिनेता अखिल अंकेनी आहे.

नागार्जुनच्या मुलाच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेल्या राणाला त्याचा मित्र आणि अभिनेता रिकुल प्रीत याने कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर राणा डग्गुबतीने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत असताना राणाने एक कॅप्शनही दिले. विमानातून प्रवास करताना जर तुम्हाला मान ठेवण्यासाठी उशी मिळाली नाही, तर सहप्रवाशाचा बिनधास्त आधार घ्या, अशा आशयाचा संदेशही त्याने दिल्याचे दिसते.

एस एस राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली द बिगनिंग’ याचा सिक्वल असलेला ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ हा दुसरा भाग येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि राणा डग्गुबती यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रभासने बाहुबली ही मुख्य भूमिका तर डग्गुबतीने त्याचा चुलत भाऊ भल्लालदेव याची भूमिका साकारली आहे. या दोन्ही कलाकारांनी या चित्रपटासाठी योग्य ती पिळदार अंगाकाठीसाठी गेली काही वर्षे त्यांच्या शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही प्रेक्षकांना भव्यता अनुभवता येणार आहे. वीएफएक्स आणि दमदार अॅक्शन सीनचा पुरेपूर भरणा यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

First Published on March 20, 2017 4:32 pm

Web Title: baahubali 2 actor rana daggubati forget his pillow during a flight