एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पण कदाचित आपणच बनवलेले रेकॉर्ड परत मोडायला बाहुबलीच्या टीमला आवडत असावे. सिनेमा कसा असावा आणि तिकीट बारीवर गल्ला कसा कमावला जातो, याचे उदाहरण म्हणून यापुढे ‘बाहुबली २’ कडे पाहिलं जाणार आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता आठवडाही उलटला पण तरीही या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये तसूभरही कमी झालेली नाही.

बॉलिवूड हंगामाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘बाहुबली २’ ने आतापर्यंत जगभरात ८८७ कोटींची भरघोस कमाई केली आहे. प्रभास आणि राणा डग्गुबतीच्या या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्येही भरघोस कमाई केली आहे. या सिनेमाने हिंदीमध्ये आतापर्यंत ३३५ कोटींची कमाई केली. तर तेलगु, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये मिळून एकूण ३८७ कोटींची कमाई केली.

‘बाहुबली २’ ने आमिरच्या ‘पीके’चा रेकॉर्डही ब्रेक केला आहे. ‘पीके’ने आतापर्यंत जगभरात ७६८ कोटी रुपयांची कमाई केली होती तर ‘दंगल’नेही ७१६ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण ‘बाहुबली २’ सिनेमाने या दोन्ही सिनेमांना केव्हाचे मागे टाकले आहे. ‘बाहुबली २’ ने पहिल्याच आठवड्यात २४७ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. व्यापार विश्लेषक श्रीधर पिल्लैई यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली होती. ‘बाहुबली २’ने ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ या सिनेमांना मागे टाकून सर्वाधिक २४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे ट्विट करत त्यांनी राजामौली यांचे अभिनंदनही केले होते. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करत पहिल्या आठवड्यातील दंगल, सुलतान आणि बाहुबली २ची कमाई सांगितली. ‘दंगल’ने सात दिवसात १९७.५४ कोटी, ‘सुलतान’ने नऊ दिवसात २२९.१६ कोटी आणि ‘बाहुबली’ने २४७ कोटी रुपयांची कमाई केली.

‘बाहुबली २’ ने भारतात ५३४ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. ‘बाहुबली २’ ने मंगळवारी ३० कोटी, बुधवारी २६ कोटी आणि गुरूवारी २२.७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर शुक्रवारी ४१ कोटी, शनिवारी ४०.४० कोटी, रविवारी ४६.५० कोटी आणि सोमवारी ४०.२५ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत ‘बाहुबली २’ ने एकूण ५३४ कोटींची कमाई केली आहे.