भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘बाहुबली २’ या चित्रपटाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. व्यापार विश्लेषकांनी तर या चित्रपटाचा उल्लेख ‘चक्रीवादळ’ असा केला आहे. केवळ दहा दिवसांमध्ये एसएस राजामौलीच्या ‘बाहुबली द कन्क्लुजन’ने तब्बल १००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘बाहुबली’सारखा चित्रपट बॉलिवूड का नाही चित्रीत करू शकत, असा सवाल करत चाहते आणि समीक्षक चित्रपटांची तुलना करत आहेत. दरम्यान, ‘बाहुबली’सारखा चित्रपट बॉलिवूडमध्ये का बनू शकत नाही याची पाच कारणं काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. बहुधा ही कारणं अभिनेता ऋषी कपूर यांनाही पटल्याचे दिसते.

ऋषी कपूर हे त्यांची मतं अगदी रोखठोकपणे सोशल मीडियावर मांडतात. ‘बाहुबली २’ बघितल्यानंतर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांबद्दलचे त्यांचे विचार ट्विटवर मांडले आहेत. त्यांनी अगदी योग्य शब्दांमध्ये हिंदी चित्रपटांवर निशाणा साधला. सुरुवातीला त्यांनी ‘बाहुबली २’ ची प्रशंसा केली. ऋषी यांना चित्रपटातील दृश्य इतकी आवडली की, त्यांनी मस्करीत त्यांची एक इच्छाही व्यक्त केली. ‘बाहुबली २’चे चित्रीकरण जेथे झालेय तेथे मला दोन बेडरूमचा फ्लॅट मिळेल का? यासाठी कोणी एजंट आहे का? असा मजेशीर सवाल त्यांनी केला. मुंबईसारख्या ठिकाणी एजंटशिवाय घर मिळणं किती कठीण असतं हे काही वेगळं सांगायला नको.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘बाहुबली’सारखा चित्रपट करायला आणि त्याच्यासारखे विक्रम रचण्यासाठी बऱ्याच चित्रपटांचा बळी द्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटलेय. याविषयी त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘या चित्रपटासारखे यश मिळवण्यासाठी भरपूर चित्रपटांचे बळी जातील. मी या इंडस्ट्रीचा हिस्सा असल्याचा मला अभिमान आहे.’

‘बाहुबली २’ ने रचलेले विक्रम मोडण्याचे एक मोठे आव्हान आता बॉलिवूड चित्रपटांपुढे आहे.