News Flash

VIDEO: राजामौलींच्या ‘महाभारता’मध्ये बिग बी ‘भीष्म’ तर रजनीकांत ‘द्रोणाचार्यां’च्या भूमिकेत?

'यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत!'

छाया सौजन्य- युट्यूब

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत!
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम!!
या ओळी आठवतायेत का? टेलिव्हिजन विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या ‘महाभारत’ या मालिकेच्या सुरुवातीलाच हा श्लोक आपल्या कानांवर पडायचा. मुळात या श्लोकामुळे एक प्रकारची वातावरण निर्मितीच व्हायची. पौराणिक कथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारी महाभारत कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी चोप्रा यांनी १९८८ मध्ये बऱ्याच कलाकारांच्या साथीने ही पौराणिक कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर या कथेचं महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात घेत विविध स्वरुपांमध्ये ‘महाभारत’ पुन्हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

‘महाभारत’ म्हटलं की कौरव-पांडव, शकुनी मामा, सारीपाटाचा खेळ, कावेबाजपणा, कृष्णलीला आणि दानशूर कर्णाच्या कथा आपसूकच डोळ्यांसमोर येतात. अशी ही सर्वांच्याच आवडीची पौराणिक कथा एस.एस. राजामौली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचं म्हटलं जातंय. मुख्य म्हणजे युट्यूबवर राजामौलींच्या महाभारतातील कास्टचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘समथिंग न्यू’ या युट्यूब चॅनलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये महाभारतामध्ये कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार आहे यावरुन पडदा उचलण्यात आलाय.

बऱ्याचजणांनी पाहिलेला हा व्हिडिओ कितपत खरा आहे हे सांगता येणं कठीण आहे. पण, जर का या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच राजामौलींनी ‘महाभारत’ कथेवर आधारित चित्रपटासाठी कलाकारंची निवड केली असेल तर तो चित्रपट भव्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडेल यात शंका नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे राजामौलींच्या महाभारतामध्ये अभिनेता प्रभास (भीम), सुपरस्टार रजनीकांत (द्रोणाचार्य), अमिताभ बच्चन (भीष्म पितामह), फरहान अख्तर (अर्जुन), हृतिक रोशन (कर्ण), अजय देवगण (दुर्योधन) आणि दीपिका पदुकोण (द्रौपदी) हे कलाकार झळकणार आहेत. मुख्य म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खान या चित्रपटामध्ये कृष्णाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. तेव्हा आता खुद्द राजामौली त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा कधी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या तरी ते ‘बाहुबली २’ला मिळणाऱ्या प्रतिसादाचा आनंद घेत आहेत. ज्या कुतुहलपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘बाहुबली २’ प्रदर्शित झाला त्याच उत्साहात किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्साही वातावरणात या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 7:18 pm

Web Title: baahubali 2 fame ss rajamoulis mahabharata dream starcast prabhas aamir khan rajinikanth amitabh bachchan
Next Stories
1 … म्हणून अक्षयकुमार वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात नाही
2 VIDEO: ‘चि. व चि.सौ.का.’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
3 … त्यावेळी चित्रपटातून माझी हकालपट्टी करण्यात आली होती; घराणेशाहीवर प्रियांकाची प्रतिक्रिया
Just Now!
X