‘बाहुबली द कन्क्लुजन’ चित्रपटाने भारतातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही वेड लावलं आहे. कटप्पाने बाहुबली का मारले? या प्रश्नाचा उलगडा केल्यानंतर आता या चित्रपटावर टिव्ही सीरिज काढण्याचा मानस निर्माता शोबू यार्लागड्डा यांनी व्यक्त केला आहे. एसएस राजामौली यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ‘बाहुबली’ चित्रपट टिव्ही सीरिज स्वरुपात काढण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. इतर सामान्य मालिकांप्रमाणे याचे चित्रण होणार नसल्यामुळे प्रत्येक सिझनमध्ये १० ते १५ भाग याप्रमाणे सीरिज स्वरुपात ‘बाहुबली’वरील मालिका काढावी लागेल, असेही त्यांनी सांगितले होते. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत निर्माता शोबू यांनी या वृत्ताला दुजोरा देत हिंदी भाषेत आम्ही या टिव्ही सीरिजची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शोबू म्हणाले की, ‘बाहुबली’ केवळ आंध्र प्रदेशपुरता मर्यादित राहिला नसून, त्याची प्रसिद्धी जगभरात पसरली आहे. या चित्रपटावर हिंदी भाषेत टेलिव्हिजन सीरिज बनवण्याचे आम्ही निश्चित केले असून, ही सीरिज इतरही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत ‘बाहुबली सीरिज’ पोहोचवता येईल. मात्र, यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार तसेच टिव्ही सीरिजची कथा कशावर आधारित असणार, हे शोबू यांनी सांगितले नाही.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या अमेरिकन टिव्ही सीरिजप्रमाणेच एसएस राजामौली आणि शोबू काहीतरी भव्य असे प्रेक्षकांसाठी घेऊन येतील, अशी अपेक्षा केली जातेय. ‘बाहुबली’ चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्सच्या तोडीचे वीएफएक्स जर टिव्ही सीरिजमध्ये वापरण्यात आले तर नक्कीच ही सीरिज अन्य मालिकांचे टीआरपी रेकॉर्डही मोडेल यात शंका नाही. त्यामुळे आता ‘बाहुबली’ टिव्ही सीरिज कधी लाँच होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले असेल.

‘बाहुबली २’ ला प्रदर्शित होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसचे बहुतेक सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. ‘बाहुबली २’ने आता एक कोटी रुपयांच्या कमाईकडे वाटचाल केली आहे. जर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटी रुपयांची कमाई करण्यात यश आले तर इतकी बक्कळ कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट असेल.