गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटरसिकांमध्ये बाहुबली २ याच चित्रपटाविषयीच्या बहुविध चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित बाहुबली २ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. २ मिनिटे चोवीस सेकंदांच्या या ट्रेलरमधील बरीच दृश्ये सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. यामध्ये चित्रपटाच्या भव्यतेची अनुभूती होत असून, त्यासोबतच एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटातील दृश्यांसाठी लावलेल्या फ्रेम्स अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. बाहुबलीच्या पहिल्या भागाची पार्श्वभूमी देत ट्रेलरला सुरुवात होते. देवसेना, अमरेन्द्र बाहुबली, कटप्पा, भल्लालदेव या सर्व पात्रांची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

मुख्य म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले असावे या प्रश्नाचे उत्तर चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आले असले तरीही त्याबद्दलची उत्सुकता जागृत करण्यामध्ये दिग्दर्शकांना यश आले आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा बाहुबली २ च्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागल्या आहेत.

बाहुबलीच्या पहिल्या भागात दिग्दर्शकांनी युद्धजन्य पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक रंगवत पेक्षकांची दाद मिळवली होती. पण, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मात्र त्याहीपेक्षा जास्त भन्नाट आणि थरारक दृश्ये साकारण्यावर राजामौली यांनी भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एक दृश्य अनेकांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्नांचा काहूर मजवत आहे, असे म्हणायला हरकत नाही. कटप्पावर बाहुबलीचा असणारा विश्वास आणि या दोघांच्याही नात्याचे वेगळेपण ट्रेलरमधील एका दृश्यात पाहायला मिळत आहे. त्यासोबतच अनुष्का शेट्टीचा लूकही सर्वांचे लक्ष वेधत आहे. माहिष्मतीच्या साम्राज्यापासून ते राजदरबारापर्यंतची दृश्ये ट्रेलरची शोभा वाढवत आहे. कलाकारांचे संवाद आणि त्याच ताकदीने समोर येणारे त्यांचे संवादकौशल्य, युद्धभूमीतील दृश्ये हे सर्व अंगावर शहारे आणणारे आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागापेक्षाही जास्त मोठ्या पातळीवर बाहुबलीच्या दुसऱ्या भागासाठी मेहनत घेतल्याचे एस. एस. राजामौली यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यांची ही मेहनत बाहुबली २ च्या ट्रेलरमधून झळकत आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘बाहुबली २’ मध्ये प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिलला तेलगु, हिंदी, तमिळ आणि मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.