‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाची लागण झाली आहे. राजामौली यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. त्यांना व कुटुंबीयांना करोनाची सौम्य लक्षणे असून सर्वांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना हलका ताप होता. ताप कमी झाला पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही करोनाची चाचणी केली. माझा व कुटुंबीयांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्हाला घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे’, असं ट्विट राजामौली यांनी केलं.

‘आम्हा सर्वांची प्रकृती ठीक असून आता काहीच लक्षणे नाहीत. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व उपचार करत आहोत आणि काळजी घेत आहोत. आमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्ही आमचा प्लाझ्मा दान करू शकू’, असं त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं.

राजामौली यांच्या या ट्विटनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी व चाहत्यांनी त्यांच्यासाठी ट्विट केले आहेत. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, असं ट्विट नेटकऱ्यांनी केलं आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी राजामौली हे त्यांच्या आगामी ‘RRR’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. यामध्ये ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत.