‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तिकिटबारीवर ‘बाहुबली २’च्या विक्रमी कमाईनंतर प्रभासने लगेचच त्याचा मोर्चा ‘साहो’कडे वळवला. या चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या उत्साहात सुरु झाले असून, अभिनेत्री श्रद्धा कपूरही यात सहभागी झाली होती. श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटववरुन ‘साहो’ चित्रपटाच्या हैद्राबादमधील सेटवरचे काही फोटोही पोस्ट करण्यात आले होते. सोशल मीडियावर हे फोटो बरेच चर्चेतही आले होते. या फोटोमुळे चाहत्यांनाही प्रभासच्या चित्रपटाविषयी थोडीथोडकी माहिती मिळत होती. पण, यापुढे तसे काहीच होणार नाहीये. कारण, ‘साहो’च्या सेटवर सर्वांसाठीच एक नवा नियम लागू करण्यात आला आहे.

बिग बजेट ‘साहो’ या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलला लवकरच अबु धाबीमध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधीच चित्रपटाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यासोबतच काही नियमही लागू करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’च्या चित्रीकरणामध्ये असणारी सुरक्षाव्यवस्था अधिक वाढवण्यात आली असून, सर्वांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सेटवरील कोणतीच माहिती, फोटो किंवा व्हिडिओ चुकूनही लीक होऊ नये यासाठी मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

‘साहो’ हा चित्रपट विविध ठिकाणी चित्रीत केला जात असल्यामुळे त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणांबद्दलची माहितीसुद्धा शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या सेटवर येणाऱ्या वाहनांपासून ते अगदी लहानसहान गोष्टींपर्यंत सर्व काही सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली असून, तसूभर माहितीसुद्धा लीक होणार नसल्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे ‘साहो’विषयीची फार माहिती श्रद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देऊ शकेल, अशी शक्यता फार धुसर आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

चित्रपटाची स्टारकास्ट, कथानक आणि बजेट पाहता काही गोष्टींबद्दल सक्तीचे निर्णय घेण्याची गरज असल्यामुळेच हा नियम लागू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेटवरील फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा फटका अप्रत्यक्षपणे चित्रपटालाही बसतो. याच चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी ‘साहो’ची टीम सध्या प्रयत्नशील आहे.