‘बाहुबली’ सिनेमातील कोणतीही घटना घ्या.. ती लख्खं लक्षात राहते. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हा प्रश्न जेवढं मनात घर करून राहतो तेवढाच प्रभाव या सिनेमातली इतर दृश्यही निर्माण करतात. २०१५ मध्ये या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागातील एक दृश्य साऱ्यांनाच लक्षात राहणार होतं आणि ते म्हणजे शिवगामी देवी एका बाळाला हातात घेऊन पाण्यात उभी असते. त्यावेळी साऱ्यांना असं वाटतं होत की ते बाळ एक मुलगा आहे. पण खरेतर ते बाळ मुलगा नसून मुलगी होते. लहानग्या बाहुबलीच्या रुपात झळकलेले ते बाळ एक मुलगी आहे.

या चिमुकलीचे नाव अक्षिता. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात ही चिमुकली झळकली होती. शूटिंगच्या वेळी अक्षिता केवळ १८ दिवसांची होती. आता ही चिमुकली अडीच वर्षांची झाली आहे. केरळच्या निलेश्वरम येथे ही वास्तव्याला आहे. अक्षिताचे वडील वाल्सन हे ‘बाहुबली’ या सिनेमाचे प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह आहेत. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजामौली आणि आर्ट डायरेक्टर साबू सायरिल हे या महत्त्वाच्या दृश्यासाठी एका छोट्या बाळाच्या शोधात होते. त्यांनी वाल्सन आणि त्यांच्या पत्नीला विनंती करुन अक्षिताची या भूमिकेसाठी निवड केली. त्यावेळी अक्षिता फक्त १८ दिवसांची होती. पाच दिवस या दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. अक्षिता झळकत असलेले ‘बाहुबली’चे पहिले पोस्टरही  राजामौली यांनी ट्विट केले होते.

baby-bahubali

बाहुबलीला अर्थात अक्षिताला शिवगामी देवी (रम्या कृष्णन) एका हातात पकडून पाण्यात उभी असलेले थरारक दृश्य केरळच्या छलकुडी धबधब्यात चित्रीत करण्यात आले होते. हे दृश्य करणे खूप कठीण असल्याचे रम्याने एका मुलाखतीत सांगितले. याविषयी ती म्हणाली होती, ‘मी पाण्याच्या आत असताना एका हातात बाळाला पकडून मला दृश्य चित्रीत करायचे होते. पाण्याचा प्रवाह अगदी जोरदार होता. पण त्याच परिस्थितीत मला पाण्याच्या पूर्ण आत राहून दृश्य चित्रीत करायचे होते. केरळमधील छलकुडी धबधबा खूप सुंदर आहे. मात्र, अशी थरारक दृश्य त्या धबधब्यात चित्रीत करणं कठीण काम होतं. त्या प्रवाहात मी बुडून जाईन की काय असा विचारही तेव्हा माझ्या मनाला शिवून गेला.

bahubali-baby

पण, काहीही झालं तरी माझ्या चेहऱ्यावर निडर भावचं दिसले पाहिजेत असं मला राजामौलीनं सांगितलं होतं. त्यामुळे पाण्याच्या आत दृश्य चित्रीत करताना मी खूप घाबरलेले. मात्र, चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पाण्याबाहेर पडताच माझ्या चेहऱ्यावर शूरवीरासारखे भाव होते.”
अशा अनेक प्रसंगातून ‘बाहुबली’ सिनेमा घडत गेला. पाच वर्षांपासून केलेले सगळ्यांचे कष्ट आता फळाला आले असंच म्हणावं लागेल. कारण सध्या प्रत्येकाच्या तोंडी फक्त ‘बाहुबली २’ सिनेमाचीच चर्चा आहे. ‘बाहुबली २’ ८५० कोटींपेक्षाही जास्तीची कमाई या सिनेमाने अवघ्या सात दिवसांत केली आहे.