असा एक काळ होता जेव्हा एखादा सिनेमा संहिता किंवा अभिनय यावरच हिट व्हायचा. पण, आता बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन झालं याचीच सिनेरसिकांमध्ये जास्त चर्चा असते. पण हे फक्त भारतात होत असं नाही. जगभरातही हीच स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा ‘बाहुबली’सारखा सिनेमा एवढा हिट होतो तेव्हा कोणत्याही सिनेमाचे त्याच्याबरोबर तुलना होणं हे अपरिहार्यच होऊन जातं.

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ हा सिनेमा फक्त १० दिवसांत १००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा भारताचा पहिला सिनेमा ठरला. बॉलिवूडच्या कोणत्याही खानला एवढी कमाई करता आलेली नाही. पण हे काही फक्त भव्य दिव्य सेट आणि लार्जर दॅन लाईफ गोष्टी दाखवल्या म्हणून झालेलं नाही तर अभिनयातही ‘बाहुबली’ सिनेमा अनेक बॉलिवूडपटांपेक्षा उजवा ठरला.

‘बाहुबली २’ मुळे फक्त तेलगू इण्डस्ट्रीच नव्याने कळली असे नाही तर प्रभासला देशभरात स्वतःची अशी वेगळी ओळख मिळाली. काही वर्षांपूर्वी १०० कोटींची कमाई करणे म्हणजे मैलाचा दगड ठरायचा आणि यात खान मंडळीच अग्रेसर असायची. आमिरच्या ‘पीके’ सिनेमानंतर शंभर कोटींच्या क्लबची व्याख्याही कालबाह्य झाली.

काही दिवसांपूर्वी ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने एका सर्वेक्षणामध्ये बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ कोण असा प्रश्न विचारला होता. आश्चर्य म्हणजे यात प्रभासने सलमान खानला मागे टाकले. ‘बाहुबली’ या एका सिनेमाने फक्त कागदोपत्रीच कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली नसून, प्रेक्षकांच्या मनावरही आता अधिराज्य गाजवायला सुरूवात केली आहे. प्रभासने फक्त सलमानलाच नाही तर शाहरुख आणि आमिर खानलाही या शर्यतीत मागे टाकले आहे.