रम्या कृष्णन हे नाव दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच हिंदी सिनेसृष्टीलाही चांगलेच परिचयाचे झाले आहे. ९० च्या दशकामध्ये रम्या यांनी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि गोविंदासारख्या बड्या नटांबरोबर काही सुपरहिट सिनेमांमध्ये कामही केले आहे. मात्र बाहुबली सिनेमामधील महाराणी शिवगामीच्या भूमिकेनंतर रम्या यांना नवीन ओळख मिळाली. आज अनेकजण त्यांना ‘बाहुबली’ला मोठं करणारी माता याच नजरेतून पाहतात.

मात्र आता रम्या यांनी शिवगामीच्या प्रतिमेतून बाहेर येण्याचा निर्णय घेतला आहे. रम्या आता ‘सुपर ड्युरेक्स’ या सिनेमामध्ये झळकणार आहे. अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांचा समावेश असलेल्या या सिनेमातील भूमिकेबद्दल रम्या यांनी नुकतीच माहिती दिल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रम्या कृष्णन् ‘सुपर ड्युरेक्स’ सिनेमामध्ये एका पॉर्न स्टारची भूमिका साकारणार आहेत. सिनेमाचा भाग असणाऱ्या ‘मल्लू अनकट’ या पॉर्न मुव्हीमधील दृष्यांमध्ये रम्या पॉर्न स्टारची भूमिका करणार आहेत.

या भूमिकेबद्दल रम्या यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पॅशन म्हणून आपण ही भूमिका साकरल्याचे सांगितले. ‘माझ्यापेक्षा माझ्या सहकालाकारांनाच या भूमिकेचा जास्त धक्का बसला. काही भूमिका या पैशासाठी स्वीकारल्या जातात, काही नाव कमावण्यासाठी तर काही पॅशन म्हणून स्वीकारल्या जातात. मी ‘सुपर ड्युरेक्स’मधील भूमिका पॅशन म्हणूनच स्वीकारली,’ असं रम्या यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘ही माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका ठरली. (‘सुपर ड्युरेक्स’) हा सिनेमा त्यामधील कलाकारांपेक्षा कथेवर अधिक भर देणार आहे. हा सिनेमा कुमारराजा यांच्या दृष्टीकोनातून साकारला आहे,’ असं रम्या म्हणाल्या.

सिनेमाचे दिग्दर्शक असणाऱ्या थियागराजन कुमारराजा यांनी रम्या यांच्या या सीनसाठी चक्क ३७ रिटेक घेतले आहेत. ‘सिनेमाचा भाग असणाऱ्या ‘मल्लू अनकट’ या सिनेमातील दृष्यांसाठी रम्या कृष्णन यांनी पॉर्न स्टारची भूमिका साकारणे अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. आम्ही यासाठी आधी नादीया मोइदू यांच्याकडे या भूमिकेसाठी विचारणा केली होती. मात्र राम्या यांनी ही भूमिका साकारण्यास होकार दिला. कदाचित आपल्या साचेबद्ध प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी राम्या यांनी ही भूमिका स्वीकारली असावी,’ असं मत कुमारराजा यांनी रम्या यांच्या भूमिकेबद्दल बोलताना व्यक्त केले.

कुमारराजा यांचीच कथा असणारा हा सिनेमा येत्या २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.