लेखक विजयेंद्र प्रसाद हे नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीला नवं नाही. पण बॉलिवूडला हे नाव कळलं ते ‘बाहुबली’ सिनेमामुळेच. प्रसाद यांनी आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या कथा लिहिल्या आहेत. पण ‘बाहुबली’ सिनेमामुळे त्यांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. सर्वाधिक कमाई करणारा भारतातील ब्लॉकबस्टर सिनेमाचे लेखक अशीच त्यांची ख्याती सर्वदूर पसरली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयेंद्र प्रसाद लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टमध्ये भाजप स्वतः पैसे गुंतवणार आहे. सिनेमात आरएसएसची स्थापना कशी झाली इथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली असून सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.
या सिनेमात संघाच्या समोर आलेली संकटं आणि त्यांच्या यशापयशावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमासाठी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सचा विचार केला जात आहे.

सध्या प्रसाद हे कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमाच्या लेखनात व्यग्र आहेत. क्रिश जागर्लामुदी दिग्दर्शित या सिनेमात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमानंतर या सिनेमाच्या ऐतिहासिक घटनांच्या तथ्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिनेमात राणी लक्ष्मीबाईची प्रतिमा चुकिच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र प्रसाद यांनी या सिनेमात झाशीच्या राणीच्या प्रतिमेला तडा जाऊ दिलेला नाही असे स्पष्ट केले. या सिनेमात कंगना रणौतसोबत अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि सोनू सुदची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

विजयेंद्र प्रसाद यांनी टॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूड आणि कॉलिवूडमध्येही लेखन केले आहे. त्यांनी ‘कुरुबाना राणी’ (कन्नड), ‘पांडु रंगा विठ्ठला’ (कन्नड), ‘जग्वार’ (कन्नड, तेलगू), ‘मर्सल’ (तामिळ) आणि सुपरस्टार विजयच्या आगामी ‘विजय ६२’ (तमिळ) तसेच सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमांची कथा आणि पटकथा लिहीली आहे.