‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मीडियम’ यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता म्हणजे दीपक दोब्रियाल. दिपक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली असून पहिल्यांदाच ते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘बाबा’ या आगामी चित्रपटामध्ये ते मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘बाबा’ या चित्रपटामध्ये त्यांची अत्यंत वेगळी भूमिका असून हा चित्रपट करताना त्यांना विलक्षण आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला! दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान बाबा या चित्रपटाने दिले’, असं ते म्हणाले.

या चित्रपटामध्ये त्यांनी एका बहिऱ्या वडीलांची व्यक्तीरेखा साकारली आहे. ही भूमिका साकारणं त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचं सांगत ते म्हणतात, ‘न बोलता स्वतःला व्यक्त करणे ही बाब त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. अशाप्रकारे संपूर्ण चित्रपट चित्रित करणे कठीण होते. सुरुवातीला मला वाटले की, मी केवळ यातील काही दृश्यं चित्रित करू शकतो, पण अशा प्रकारची व्यक्तिरेखा संपूर्ण चित्रपटात साकारणे आणि ती व्यक्तिरेखा जगणे ही बाब अत्यंत आव्हानात्मक अशीच होती.”

पुढे ते म्हणतात, ‘माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट सरस आहे. या चित्रपटाने मला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्वच गोष्टींसाठी मी मराठी चित्रपटसृष्टीचा नेहमीच ऋणी राहीन’.

या चित्रपटात दीपक दोब्रियाल यांच्या व्यतिरिक्त नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे.