नात्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजवर मराठी सिनेसृष्टीत आले. परंतु संवादाच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या चित्रपटांपेक्षा संवादाविना नात्यांची गुंफण उलगडणारा चित्रपट काढण्याचे आव्हान पेलणारे फार कमी असतात. हे आव्हान बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या बाबा या चित्रपटाने पेलले आहे. राज गुप्ता दिग्दर्शित बाबा हा चित्रपट ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे, ज्यात हिंदीत आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता दीपक दोब्रियाल पहिल्यांदाच मराठी चित्रपटात तेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपक दोब्रियाल, नंदिता धुरी, दिग्दर्शक राज गुप्ता आणि निर्माते अशोक सुभेदार यांच्याशी लोकसत्ता ऑनलाइनने संवाद साधला.

प्रायोगिक रंगभूमी, मग वेगळ्या आशयाची मालिका आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटामधून सामान्य माणसांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली अभिनेत्री नंदिता धुरी-पाटकर चित्रपटाविषयी सांगते, एखादी भूमिका ग्लॅमरस आहे की नाही हे पाहून मी कधी चित्रपट स्वीकारत नाही. चित्रपटाचा आशय, त्यातली जाणीव आणि लोकांना त्यातून काय देता येईल याचा प्रयत्न मी कायम करत असते. त्यात ‘बाबा’ चित्रपटासाठी विचारले गेले तेव्हा मी होकार दिला, परंतु ते एक आव्हान आहे याची नक्कीच जाणीव होती. कारण कोणत्याही भाषेचे माध्यम नसताना एका मूक-बधिर कुटुंबातील संवाद आणि त्यांच्या भावनांना न्याय देऊ न तो लोकांपर्यंत पोहचवणे ही खरी जबाबदारी होती. या चित्रपटातील घोषवाक्याप्रमाणे ‘भावनेला भाषा नसते’ आणि मग भाषेच्या पलीकडे जाणारी, केवळ हावभावातून व्यक्त होणारी भाषा, तिचा अभ्यास, तिचे आचरण आणि ती कुठे खोटी वाटणार नाही अशा पद्धतीने ती आत्मसात करणे हा खूप मोठा अनुभव होता, असे तिने सांगितले. यात मूक-बधिर आईची भूमिका साकारण्यासाठी त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, एखाद्या गोष्टीवर ते कसे व्यक्त होतात, संवाद कसे साधतात, एखाद्या गोष्टीला समजून घेण्याची त्यांची पद्धत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही भूमिका साकारली आहे. त्यासाठी आमचे दिग्दर्शक राज गुप्ता आणि मार्गदर्शक सुनील सहस्रबुद्धे यांची मोलाची मदत झाल्याचे तिने सांगितले.

ही भूमिका साकारताना खूप मोठे आव्हान होते, ते म्हणजे मूक-बधिरांमधील संवाद हा हावभावावरच अवलंबून असतो. आणि ही भूमिका करत असताना कधी ना कधी सहजतेने तोंडून संवाद निघून जायचा. किंवा ओठ हलायचे. या दोन्ही गोष्टी करून चालणार नव्हत्या. त्याचे भान ठेवावे लागत होते, असे नंदिताने सांगितले. नंदिताने या चित्रपटात पहिल्यांदाच दीपक दोब्रियाल या हिंदीतील कलाकाराबरोबर काम केले आहे. त्यांच्या हिंदीतील लौकिकाचे दडपण होते का, याबद्दल बोलताना हिंदूीतील कलाकार जेव्हा मराठीत काम करतात तेव्हा आपसूकच एक दडपण किंवा थोडंसं अवघडलेपण जाणवतंच. त्यामुळे दीपक यांच्याबरोबर काम करायचे आहे हे ऐकल्यावर मला दडपण आलंच होतं. मात्र कलाकार म्हणून ते इतके साधपेणाने राहतात. सहकलाकारांबरोबर संवाद साधत त्यांना आपलेसे करून घेत काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे सुरुवातीची भीती चेपली. शिवाय, तेही नाटकातून आलेले असल्याने माझी त्यांच्याशी छान मैत्री झाली. दोन प्रायोगिक नाटकवाले एकत्र आले की ते त्या गप्पांमध्ये रमतात, तेच आमचेही झाले होते, असे नंदिताने सांगितले. आपली कारकीर्द ही प्रायोगिक नाटकांमुळेच घडली असल्याचे नंदिता सांगते. रुपारेल महाविद्यालयात अगदी शेवटच्या वर्षी सहज म्हणून मी अभिनयाकडे वळले. परंतु तिथपासून सुरू झालेला प्रवास पुढे आविष्कार नाटय़संस्थेच्या माध्यमातून सुरू राहिला. मग आयदान, बया दार उघड या नाटकांमधून समाज जाणिवेचे आणि अभिनयाचे संस्कार घडत गेले. आज चित्रपटांमधून जे मी स्वत:ला पाहते आहे, त्याचे श्रेय प्रायोगिक नाटकांनाच जात असल्याचे तिने सांगितले.

हिंदीत साहाय्यक अभिनेत्यांना फारशी ओळख नव्हती, मात्र ‘ओमकारा’,‘तनू वेड्स मनू’सारख्या चित्रपटातून दीपक दोब्रियाल या कलाकाराने केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या. किंबहुना, साहाय्यक नायक किंवा चरित्र नायकांना ओळख मिळवून देण्यात आज जे कलाकार यशस्वी ठरले आहेत, त्यात दीपक दोब्रियाल यांचे नाव अग्रणी आहे. यातील यश-अपयश ही लांबची गोष्ट आहे, कलाकार म्हणून अनेक चित्रपटांमधून सीहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका करताना मी कोणतीच भूमिका कधी कमी लेखली नाही. मुळात कोणतीही भूमिका कधीच कमी दर्जाची नसते, साहाय्य्क अभिनेता म्हणून काम करताना ही गोष्ट मला प्रकर्षांने जाणवते, असे दोब्रियाल यांनी सांगितले. काम किती आहे त्यापेक्षा काम काय आहे आणि त्याला आपण किती न्याय देतो हे महत्त्वाचे ठरते. मग तेच गणित भाषेलाही लागू होते. अभिनयाला भाषा नसते. तुमचा अभिनय बोलका हवा जेणेकरून तुम्ही कोणत्याही भाषेत सहज काम करू शकता, असं दोब्रियाल यांनी सांगितलं.

बॉलीवूडलाही मराठीचे कौतुक!

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपट हा काळाच्या पुढे गेलेला आहे. मला मराठी बोलता येत नाही, परंतु मराठी भाषा संपूर्ण समजते. आणि चित्रपट पाहताना आपला दृष्टिकोन योग्य असेल तर कोणत्याही भाषेतील आशय आपल्यापर्यंत पोहचतोच, असे दीपक दोब्रियाल यांनी सांगितले. मराठीत सातत्याने नवनवीन विषय येत आहेत. आणि ते चित्रपट हिंदीतील लोकांकडून आवर्जून पाहिले जातात. हे यश नागराज मंजुळेसारख्या काही दिग्दर्शकांचे आहे, असे त्यांनी सांगितले. फँ ड्री, सैराट असे चित्रपट मीही पाहिले आहेत. त्यातील आशय खूपच काळजाला भिडणारा आहे. आणि असे चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतात, या सगळ्याचेच बॉलीवूडला कौतुक असून ते लोक सातत्याने मराठी चित्रपट बघत असतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

अभिनेत्यांच्या निवडीविषयी बोलताना दिग्दर्शक राज गुप्ता सांगतात, या चित्रपटातील मूक-बधिरांच्या भाषेवर कलाकारांनी एक महिना मेहनत घेतली, त्याच भाषेवर मी एक वर्ष अभ्यास करत होतो. त्यामुळे ती लोकांपर्यंत काय तीव्रतेने पोहचायला हवी याचा अंदाज मला होता. आणि मला तसेच कलाकार अपेक्षित होते. हा केवळ अभिनय नसून ही कथा आहे जी लोकांना सांगायची आहे. आणि त्या जाणिवा आणि दु:ख लोकांसमोर पोहचवू शकतील असे कलाकार नंदिता आणि दीपक यांच्या रूपाने मिळाले. मराठीत काम करण्याची संधी मिळाली आणि तेही असा आगळावेगळा विषय मांडता आला याचे समाधान आहे. त्यामुळे पुढेही नक्कीच मराठीत काम करायला आवडेल, असेही राज म्हणाले.

शब्दांकन – निलेश अडसूळ