मराठी व्यावसायिक आणि हौशी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या निमित्ताने या ७७ वर्षीय तरुण नेपथ्यकाराशी साधलेला संवाद.

तिसरी घंटा होते, नाटकाचा मखमली पडदा उघडतो, समोर जे दृश्य अर्थात नेपथ्य दिसते तिथेच पहिली टाळी पडते आणि पुढचे दोन ते अडीच तास प्रेक्षक त्या नाटकाच्या आभासी जगात रंगून जातात. रंगमंचावर उभारलेले ते घर त्यांचे होऊन जाते. मग तो बंगला असो,  झोपडी असो किंवा राजमहाल असो. प्रेक्षकांच्या मनाची तार त्या देखाव्याशी जुळते. हे कौशल्य नेपथ्यकाराचे असते. मराठी व्यावसायिक आणि हौशी रंगभूमीवरील ज्येष्ट नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. पुरस्काराबाबत आपल्या भावना ‘रविवार वृत्तान्त’कडे व्यक्त करताना पार्सेकर म्हणाले, ‘नेपथ्यकार म्हणून रंगभूमीवर आजवर मी जे काम केले, त्या कामाची पावती या  पुरस्काराच्या रुपाने मला मिळाली. माझ्या कामाची दखल घेतली गेली असे वाटते. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाटय़संपदा’ नाटय़संस्थेच्याही नाटकांचे नेपथ्य मी केले आहे. त्यामुळे पणशीकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नक्कीच आनंद वाटतो’.

सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देताना पार्सेकर यांनी सांगितले, आम्ही पार्सेकर मूळचे गोव्याचे. आमच्या घरी नाटक, संगीत यांचा वारसा होता. माझे वडील अनंत पार्सेकर हे संगीतकार म्हणून काम करत होते. काका परशुरामबुवा पार्सेकर यांनाही संगीत, गाण्याची आवड होती. भाऊ श्रीधर पार्सेकर उत्तम व्हायोलिन वादक. त्यामुळे लहानपणापासूनच कलेचा वारसा मला मिळाला. चौथीपर्यंतचे शिक्षण मुंबईत महापालिकेच्या शाळेत तर पुढील शिक्षण विल्सन हायस्कूलमध्ये झाले. विल्सन हायस्कूलमध्ये असताना सर्व प्रकारची वाद्येही मी वाजवत असे. पुढे जे. जे. कला उपयोजित महाविद्यालयात प्रवेश घेतला. रंगकर्मी दामू केंकरे हे येथे आम्हाला शिकवायला होते. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्याबरोबर आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी नेपथ्याचे काम करण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी ‘रंगायन’ची स्थापना केल्यानंतर दामू केंकरे यांनी त्यांना माझे नाव सुचवले आणि मी विजयाबाईंकडे काम करु लागलो. तेथे बॅकस्टेजसाठीकाम  केले. त्यांच्याकडेही शिकायला मिळाले. राज्य नाटय़सपर्धेत विजयाबाई यांनी विजय  तेंडुलकर यांचे ‘कावळ्यांची शाळा’ हे नाटक केले होते.  त्याचे नेपथ्य करण्याची संधी विजयाबाई यांनी मला दिली. स्पर्धेत नेपथ्यासाठीचे पहिले पारितोषिक मिळाले. पुढे स्पर्धेतच सुरेश खरे लिखित ‘सागर माझा प्राण’ या नाटकाचे नेपथ्य केले.  हळुहळू नेपथ्यकार म्हणून काम करायला सुरुवात  केली. ‘स्वर जुळता गीत तुझे’ हे माझे व्यावसायिक रंगभूमीवरील नेपथ्यकार म्हणून पहिले नाटक होते, असं ते म्हणतात.

त्यानंतर पार्सेकर यांनी मागे वळून पाहिले नाही. मोहन तोंडवळकर यांच्या ‘कलावैभव’ आणि नंदकुमार रावते यांच्या ‘अभिजात’ या नाटय़संस्थेसाठी त्यांनी अनेक नाटके केली. मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ नाटय़संस्थेचा अपवाद वगळता अन्य सर्व मान्यवर निर्माते व नाटय़संस्थांबरोबर नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. ‘काचेचा चंद्र’, ‘मला उत्तर हवाय’, ‘गुंतता हृदय हे’, ‘सूर राहू दे’, ‘सुरुंग’, ‘वर्षांव’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘एक शून्य  बाजीराव’,  ‘मी जिंकलो मी हरलो’ही पार्सेकर यांची काही गाजलेली नाटके.

तेव्हाच्या आणि आत्ताच्या नेपथ्यात खूप बदल झालेला आहे. आज नवे तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या बदलाविषयी माहिती देताना पार्सेकर म्हणाले, काही वर्षांपूर्वी नाटकांच्या नेपथ्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या भिंतींची उंची १२ ते १४ फूट असायची. या भिंती दोरीने जोडल्या जात होत्या. आता या भिंतींची उंची साडेनऊ ते  दहा फुटांवर आली आहे. आत्ताचे नेपथ्य सुटसुटीत झाले आहे. काही वर्षांपूर्वी पडदे किंवा भिंती रंगवून नाटकातील देखावा उभा केला जायचा. आता संगणकावर सर्व काही तयार केले जाते. ‘अभिजात’ नाटय़संस्थेसाठी मी लाकडाचा फिरता रंगमंच तयार केला होता. तो माझा स्वत:चा प्रयोग होता. पुढे प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’साठीही तसा लाकडी फिरता रंगमंच तयार केला. आता नव्या पिढीला सर्व सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आजकाल नेपथ्यात ‘तयार’ वस्तूंचाही (रेडीमेड) मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. वेगवेगळ्या ‘लेव्हल’ही वापरल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली. ‘संहितेची गरज लक्षात घेऊन नेपथ्य साकारावे. एखाद्या वस्तूची आवश्यकता असेल तरच त्याचा अंतर्भाव नेपथ्यात करावा. काहीतरी करायचे किंवा दाखवायचे म्हणून नाहक कोणतीही गोष्ट करु नका’, असा सल्लाही त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्या नव्या नेपथ्यकारांना दिला.

एखादे नाटक नेपथ्यासाठी स्विकारल्यानंतर तुम्ही कसे काम करता?, या प्रश्नावर पार्सेकर म्हणाले,‘एखादे नाटक माझ्याकडे नेपथ्यासाठी आले की नाटकांची संपूर्ण संहिता मी वाचतो. नेपथ्यात काय काय करता येईल याचा एक आराखडा ते नाटक वाचत असतानाच मनात आणि डोक्यात तयार होतो. संहिता वाचून पूर्ण झाली की मी नाटकाच्या  नेपथ्याची थेट छोटी प्रतिकृती तयार करुन ती दिग्दर्शकांना दाखवतो.  त्यांच्या काही सूचना किंवा बदल असतील तर ते करतो आणि त्यानंतर नेपथ्याचा अंतिम आराखडा तयार होतो व तुम्हाला तो थेट रंगमंचावर पाहायला मिळतो’.

बाबा पार्सेकर यांचे मूळ नाव सुरेश. पण घरातील आणि परिचित मंडळी त्यांना ‘बाबा’ म्हणत. त्यामुळे पुढे हेच नाव रुढ झाले. वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या बाबांचा कामाचा उत्साह आजही कायम आहे. त्यांचे नेपथ्य असलेले ‘येस माय डिअर’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरु आहे. व्यावसायिक नाटकांबरोबरच लावणी व अन्य काही कार्यक्रमांसाठीही मी नेपथ्यकार म्हणून काम केले आहे. आजवरच्या प्रवासात ४८५ नाटकांचे नेपथ्य केले असून ही संख्या पाचशेपर्यंत नेण्याचा माझा विचार असल्याचे पार्सेकर यांनी गप्पांचा समारोप करताना सांगितले.