News Flash

‘तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे’

रसिकांच्या प्रेमावरच प्रत्येक कलाकार हा जीवन जगत असतो. तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे,

पुणे भारत गायन समाजातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांना संगीतभूषण पं.राम मराठे स्मृती पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला. शैला दातार आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या वेळी उपस्थित होते.

आशा भोसले यांची भावना

संगीतभूषण पं. राम मराठे यांच्याएवढय़ा मोठय़ा कलाकाराच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याच्या पात्रतेची मी नाही, पण तुम्ही ज्या प्रेमाने आणि आदराने हा पुरस्कार दिलात त्यामुळे मला तो स्वीकारावासा वाटला. माझ्यावर असेच प्रेम राहूद्यात. रसिकांच्या प्रेमावरच प्रत्येक कलाकार हा जीवन जगत असतो. तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे, अशी भावना ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी सोमवारी व्यक्त केली. ‘शूरा मी वंदिले’ हे मा. दीनानाथ मंगेशकर यांचे नाटय़पद सादर करीत आशाताईंनी रसिकांना जिंकले.

पुणे भारत गायन समाजातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शैला दातार आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर या वेळी उपस्थित होते.

‘माणूस’ चित्रपटातील राम मराठे यांची भूमिका मला आठवते. मी लहान होते. पण, ‘अस्सा नवरा आपल्याला हवा’, असं त्यावेळच्या प्रत्येक मुलीला वाटायचं, असे सांगून आशा भोसले म्हणाल्या, सुधीर फडके यांनी मला पुण्यातच ‘पुढचं पाऊल’ चित्रपटात गाण्याची संधी दिली. ‘दूधभात’ चित्रपटातील पुलंची गाणी, वसंत पवार यांच्या लावण्या हे सगळं मी पुण्यातच गायले आहे. बाबासाहेबांना मी १९६० पासून ओळखते. त्यावेळी अप्पा दांडेकर यांच्यासमवेत ते घरी यायचे. ‘जैत रे जैत’मधील ‘चिंधी’ त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वावरूनच लिहिली. मुंबईमध्ये हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे मी सुरेश भटांची गाणी गायले. मी १२०० मराठी गीते गायली आहेत. माझ्याइतकी मराठी गाणी दुसऱ्या कोणीच गायली नसतील. इतके लेखक येत असत. जणू आमचे घर शारदेचा दरबार भरल्याप्रमाणे असायचे. आता ८४ व्या वर्षांत पदार्पण केले असले तरी मी ३८ वर्षांचीच आहे असे मला वाटते. कितीही ताण असला तरी मी सतत हसत असते.

मनोगत व्यक्त करून जागेवर बसत असताना रसिकांनी त्यांना गाण्याचा आग्रह केला. ‘एक नाही तर दोन गाणी गा’, अशी विनंती केल्यानंतर ‘फुकटात मिळेल ते सगळं चांगलं असतं. त्यालाच पुणेकर म्हणतात’ अशी कोटी आशाताईंनी केली. बोलण्याच्या ओघात त्यांनी ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ आणि ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ या गीताची झलक सादर केली.

मीही तरुणपणी गाण्याचे ठरविले होते. माझा आवाजही बरा होता. पण, मंगेशकर मागे पडतील म्हणून मी कधी गायलो नाही, अशी मिश्कील कोटी पुरंदरे यांनी केली. मोगऱ्याचा वास फूल सोडून जात नाही तशा मंगेशकरांच्या आठवणी मी जपून ठेवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रवींद्र खरे यांनी मानपत्राचे वाचन केले. सावनी दातार-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात शैला दातार आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे गायन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 5:07 am

Web Title: babasaheb purandare present award to asha bhosle
Next Stories
1 मालिकेच्या चित्रीकरणासाठी नागाची हेळसांड!
2 ३५० कोटी रुपयांचा ‘रजनी’पट
3 मकरंद अनासपुरे सरकारी सेवेत
Just Now!
X