काही नात्यांची समीकरणं इतकी खास असतात की ती कितीही पिढ्या आणि काळ बदलले तरीही ही समीकरणं मात्र बदलत नाही. असंच एक समीकरण म्हणजे वडील- मुलीच्या नात्याचं. वडिलांच्या मनात मुलीसाठी एक खास जागा असते. जी कधीच कोणा दुसऱ्याला मिळत नाही हे सर्वज्ञात आहे. अभिनेता अभिषेक बच्चनच्याही मनात अशाच काही भावना दाटून आल्या आहेत. त्याची इन्स्टाग्राम पोस्ट पाहून याचा अंदाज लावता येतोय.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आगामी ‘मनमर्जिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काश्मीरमध्ये होता. बरेच दिवसांच्या चित्रीकरणानंतर, कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर अभिषेक जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याच्यासाठी एक खास सरप्राइज वाट पाहात होतं. मुख्य म्हणजे बऱ्याच दिवसांनी आपले बाबा परतणार यासाठी खुद्द आराध्याने हे सरप्राइज तयार केलं होतं.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची उपस्थिती

जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर जेव्हा अभिषेक त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा एका गोष्टीवरच त्याची नजर खिळली. ती गोष्ट म्हणजे आराध्याने लिहिलेला एक गोड मेसेज. अभिषेकच्या टेबलवरील कॉम्प्युटरवर आराध्याने ‘आय लव्ह यू पापा’, असं लिहिलेला एक मेसेज चिकटवला होता. आपल्या चिमुरडीने लिहिलेला तो मेसेज आणि वडिलांना सरप्राइज देण्याचा तिचा हा प्रयत्न त्याला फारच आनंद देऊन गेला. अभिषेकने सोशल मीडियावर आराध्याच्या या मेसेजचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला. सोबतच एक सुरेख कॅप्शन लिहित त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याची ही पोस्ट वाचून अनेकांनीच आराध्याची प्रशंसा करत ज्युनियर बच्चनच्या आणि त्याच्या मुलीच्या नात्याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.