निलेश अडसुळ

करोनामुळे जगरहाटीचे सारे व्यवहार ठप्प झाले. अगदी मनोरंजनासाठी बाहेर पडणारा नाटक-सिनेमांचा प्रेक्षक थिएटर बंद असल्याकारणाने घरात अडकून पडला. नाटय़गृहे, चित्रपटगृहे बंद असले तरी प्रेक्षकांना ओटीटीचे माध्यम खुले झाले आहे. असे असले तरी ओटीटी पाहण्यासाठी करावे लागणारे उपद्वय़ापही काही कमी नाहीत. त्यापेक्षा टीव्हीवर दाखवणारा आशय बरा असं म्हणणाराही प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे. थोडक्यात काय तर मालिका, चित्रपट यांचा घरबसल्या आनंद घेणं हेही तितकंच सुखावह आहे. त्यामुळे वर्क फ्रोम होम किंवा सुट्टीच्या निमित्ताने घरी असणाऱ्यांना करमणुकीसाठी मालिकांचा मोठा आधार मिळणार आहे.

सोनी मराठी वरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत आता आनंदी मोठी झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या आनंदीसाठी स्थळ बघणं सुरु आहे. आता नीना कुलकर्णी या आनंदीच्या आज्जीच्या भूमिकेत दिसतील आणि रूपल नंद ही अभिनेत्री मोठय़ा आंनदीची भूमिका साकारणार आहे. तर ‘ह. म.  बने तु. म. बने’ ही  मालिका नेहमीच वेगळ्या विषयांवर भाष्य करते. गेल्या आठवडय़ात जगभरात पसरलेल्या करोना विषाणू वर आधारित भाग या मालिकेत झाला होता. येत्या आठवडय़ात बने कुटुंब एकत्र मिळून गुढीपाडवा साजरा करतील. ‘सावित्रीजोती’ या मालिकेत या आठवडय़ात जोतीराव आपल्या वाळवेकर नामक मित्राला घेऊन तालमीत जातात आणि तिथे त्यांचे राजारामाशी भांडण होते. केशवभट घरातल्यांच्या मनात सती मंदिर बांधावं याबद्दल फूस लावतात. आता जोतिरावांपासून लपवून हे कार्य पूर्ण होईल का की याचाही बिमोड जोतिराव करतील, हे आगामी भागात कळेल.

याच वाहिनीवरील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात आगामी भागात दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकर यांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचे सादरीकरण केले जाणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धावपळ सुरु आहे. व्याही भोजनाचा शाही कार्यक्रम रंगल्यानंतर मालिकेत हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नाचा राजेशाही थाट पाहायला मिळणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी देवकुळे आणि इनामदार कुटुंबाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या मुलाच्या प्रेमापोटी दीपाला स्वीकारते. पण सौंदर्या खरंच बदलली की यामागे तिचा काही डाव आहे, याचे उत्तर मात्र पुढच्या भागांमध्ये मिळेल. ‘वैजू नंबर वन’ या नव्याकोऱ्या मालिकेत विनोदाच्या माध्यमातून  करोना आजाराशी कसे दोन हात करावे याचा संदेश दिला जाणार आहे.  मालिकेतील हलके फुलके विषय प्रेक्षकांना आवडत आहेत. करोनाचं संकट आणि सर्वांचाच असलेला घरोबा यात ही मालिका आपल्या रंजनात नक्कीच भर घालेल. तर जवळपास २ वर्षांंहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली याच वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेची सांगता भक्तीपूर्ण वातावरणात होणार असून युगानुयुगे भक्तांचा माऊली प्रमाणे सांभाळ करण्याचं वचन देत विठुमाऊली शरीररूपाने अंतर्धान पावणार आहेत. संत पुंडलिक, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा यांसारख्या अनेक संतांनी विठूनामाचा गजर चिरंतन ठेवला त्याच गजरात मालिकेचा शेवट होईल. २२ मार्चला रात्री ८ वाजता हा भाग प्रदर्शित केला जाईल.

रविवारी अनेकांना घरी बसून काय पहायचं असा प्रश्न पडला असेल तर, स्टार प्रवाह वाहिनीवर रविवार, २२ मार्चला दुपारी १२ वाजता ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तर सोनी मराठीवर दिवभर चित्रपटांची मैफल रंगणार आहे. यामध्ये पक पक पकाक, चश्मेबहाद्दर, तू हि रे, हिरकणी हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यामुळे हा रविवार प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल. तर स्टार मुव्हीजवरही रविवारी, २२ मार्चला एकापाठोपाठ एक इंग्रजी सुपरहिट चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. द एक्स्पान्डेबल्स २, अँट मॅन अ‍ॅण्ड द वास्प, कॅ प्टन माव्‍‌र्हल, फ्रोझन, कोको, आईस एज – डॉन ऑफ द डायनॉसॉर, अ‍ॅव्हेंजर्स – इन्फिनिटी वॉर, कॉन एअर आणि प्रिन्स ऑफ द पर्शिया :  द सॅण्ड्स ऑफ टाईम हे चित्रपट दिवसभरात दाखवण्यात येणार आहेत.